news roday, वैजापुरात नगराध्यक्षपदासाठी प्रतिष्ठेची लढत ; चुरशीच्या लढतीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष

वैजापूर, ता .01- नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेसह भाजप व काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आखाड्यात असल्याने 'घमासान' होणार आहे. या पदासाठी शिवसेना व भाजप उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचीच कसोटी लागणार आहे. शहरातील चौकाचौकात, कट्ट्यांवर चर्चा रंगली असली तरी अंदाज बांधणे कठीण जात आहे. त्यामुळे 'मैदान' कोण मारणार ? याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. 

     डॉ दिनेश परदेशी   संजय बोरणारे    सुभाष गायकवाड 

पालिका निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांसाठी 'रात्र कमी अन् सोंगे फार' अशी अवस्था आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी अत्यल्प दिवस देण्यात आल्याने उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नाही म्हणायला प्रचारासाठी आणखी एक दिवस वाढवून दिल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ. दिनेश परदेशींसह शिवसेनेचे संजय बोरनारे व काॅंग्रेस आघाडीचे सुभाष गायकवाड मैदानात आहेत. साधारणतः दहा ते पंधरा दिवसांपासून शहरात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांसह नगरसेवकपदांच्या उमेदवारांनी घरोघर जाऊन प्रचार करण्यावर आतापर्यंत भर दिला. शहरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा अपवाद वगळता कोणत्याही बड्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. त्यामुळे प्रचाराचा गाडा स्थानिक नेत्यांच्या जोरावरच ओढला जात आहे. उमेदवारांनी शहर पिंजून काढत मतांचा 'जोगवा' मागत असले तरी या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा मतदारांचीच कसोटी लागणार आहे. डॉ. दिनेश परदेशी व संजय बोरनारे यांच्यात 'जम के मुकाबला' असल्याने निवडणुकीची अंदाज बांधणे मतदारांना कठीण झाले आहे. हे दोन्हीही उमेदवार सर्वार्थाने 'सक्षम' आहे. फरक इतकाच की एक राजकारणात मातब्बर अन् दुसरा नवखा. परंतु असे असले तरी आमदार रमेश बोरनारे यांच्या 'तालमीत' घडवून अचानक पुढे आलेले उदयोन्मुख नेतृत्व. राजकारण जवळून पाहिले. परंतु प्रत्यक्षात राजकारणात आताच उडी घेतली. एवढाच काय तो फरक आहे. काॅंग्रेस आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुभाष गायकवाड यांनाही हलक्यात घेऊन चालणार नाही. त्यांनीही शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पद भूषविलेले आहे. शहरात माळी समाजाचे ४ हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी राहील. असेही म्हणता येणार नाही. परंतु असे असले तरी या मतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ओबीसी समाजासह अन्य समाजातील मतदार त्यांना किती 'हातभार' लावतो? याबाबत आज अंदाज, आडाखे बांधता येणार नाही. त्यांनी घेतलेली मते कुणाच्या पथ्यावर अन् कुणाच्या बरबादीवर? हे निकालानंतर समजेलच. परंतु लढत घमासान असणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांच्या भाषणांनीच रंगत आणली असून एकमेकांवर 'राळ' उठवली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींसह एकमेकांचे उणेदुणे आणि कुन्हे काढण्याची कुणीच संधी सोडली नाही. सोशल मीडियावर सुरू असलेली धुम पाहता मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. एकंदरीतच नगराध्यक्ष पदासाठी जोरदार 'फाईट' असून जो शेवटपर्यंत रणांगणात 'टिकून' राहील तोच नगराध्यक्ष होईल. 'विकास' हा मुद्दा केव्हाच मागे सारला गेला. साम, दाम, दंड व भेद रणनीतीचा अवलंब करील तोच जिंकणार! हे मात्र नक्की. 

पैशांसह दारूचा महापूर; यंत्रणा बेखबर ...

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पैशांसह जेवणावळी, ओल्या पार्ट्यांची धूम सुरू आहे. दारू आणि पैशांचा 'महापूर' आलेला आहे. मतदारांना 'वाटप' सुरू आहे. 'अर्थ'शास्त्राच्या जोरावर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. निवडणुकीसाठी एकूण १७ स्थायी व भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शासनाचे स्थायी पथके, भरारी पथके केवळ बघ्यांच्या भूमिकेत आहेत. गोपनीय शाखाही 'कुंभकर्णी' झोपेत आहेत. आजपर्यंत एकही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे शहरात काय चालू आहे ? हे सामान्य मतदारांना माहीत आहे. परंतु पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बाबीची भणक देखील नाही. हे विशेष! त्यामुळे यंत्रणा दावणीला बांधलेली आहे की हेतूपुरस्सर ती दुर्लक्ष करीत आहेत? याचा अंदाज मतदारांना यायला तयार नाही.

Post a Comment

0 Comments