news today, वैजापुरात विक्रमी 73.30 टक्के मतदान ; 21 डिसेंबरला मतमोजणी

वैजापर, तर.03 - वैजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदांच्या 23 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (ता.02) शांततेत पार पडली. या निवडणुकीसाठी सायंकाळपर्यंत सरासरी 73.30  टक्के मतदान झाले. निवडणूक रिंगणात उतरलेल्या 74 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान शहरातील काही मतदान केंद्रांवर शाब्दिक खडाजंगीचा अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार झाल्याचे वृत्त नाही.

वैजापूर पालिका निवडणुकीसाठी  शहरात एकूण 48 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. शहरात एकूण  42 हजार 334 मतदार असून यामध्ये 20 हजार 991 पुरूष तर 21 हजार 343 स्त्री  लमतदारांचा समावेश आहे. त्यापैकी 15 हजार 346 स्त्री व 15 हजार 684 पुरुष अशा एकूण 31 हजार 30 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत केवळ 6.86 टक्के मतदान झाले होते. सकाळपासूनच मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू होती. परंतु त्यानंतर मतदानाचा टक्का झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 73.30 टक्के मतदान झाले. 

शहरात प्रभागनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे ...

प्रभाग क्रमांक 1) 2700 पैकी 2049, प्रभाग क्रमांक 2) 3999 पैकी 2684, प्रभाग क्रमांक 3) 3693 पैकी 2823, प्रभाग क्रमांक 4) 3997 पैकी 2796, प्रभाग क्रमांक 5) 4183 पैकी 2999, प्रभाग क्रमांक 6) 3121 पैकी 2385, प्रभाग क्रमांक 7) 3852 पैकी 2865, प्रभाग क्रमांक 8) 2481 पैकी 1927, प्रभाग क्रमांक 9) 2762 पैकी 2022, प्रभाग क्रमांक 10) 2887 पैकी 2135, प्रभाग क्रमांक 11) 3359 पैकी 2362, प्रभाग क्रमांक 12) 5496 पैकी 3983 

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे मतदानावर लक्ष...

दरम्यान गेल्या पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरासरी 68 टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उमेदवार संजय बोरनारे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मतदानावर लक्ष ठेवून होते. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत बिघोत व तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

Post a Comment

0 Comments