वैजापूर, ता.04 - 2 डिसेंबर रोजी झालेल्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाल्याने त्याचा लाभ कुणाला होणार आणि त्याचा फटका कुणाला बसणार हीच चर्चा काल दिवसभर शहरात सुरू होती. त्यामुळे वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी की संजय बोरणारे होणार याबाबतची उत्सुकता वैजापूरकरांना लागली आहे.
नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शहरात 68 टक्के मतदान झाले होते. मात्र यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त 73.30 टक्के मतदान झाले. 5 ते 6 टक्के मतदान जास्त झाले असून याचा फायदा कुणाला होईल याची चर्चा शहरात रंगली आहे. शहरात 42 हजार 334 मतदार आहेत. त्यापैकी 30 हजार 030 मतदारांनी मतदान केले. यामध्ये दलीत व मुस्लिम बहुल असलेल्या प्रभाग क्रमांक 3, 5, 6, 9 व 12 या प्रभागांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला. सर्वाधिक मतदान या प्रभागात झाले असून जास्त झालेल्या या मतदानाचा फायदा कोणाला होईल याबाबत कार्यकर्त्यांमध्ये आकडेमोड सुरू झाली आहे.
आ.रमेश पाटील बोरणारे यांचे लहान बंधू संजय बोरणारे यांना शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली असून प्रथमच ते निवडणूक लढवित आहेत. आ.बोरणारे यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये शहरातील विकास कामांसाठी जवळपास 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून शहरात मोठ्याप्रमाणात विकास कामे झाली आहेत. आ. बोरणारे यांनी केलेली विकास कामे व निवडणुकीत त्यांनी घातलेले लक्ष पाहता संजय बोरणारे 'विनर' ठरू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर भाजपचे डॉ. दिनेश परदेशी हे गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून वीस वर्षांपासून नगरपालिकेची सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. शहराच्या प्रत्येक प्रभागात ते परिचित असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. राजकारणातील त्यांचा अनुभव व जनसंपर्क यांचा त्यांना फायदा होईल असाही अंदाज काही जण व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आता 'मुकद्दर का सिकंदर' कोण होणार हे 21 तारखेला स्पष्ट होणार आहे.
0 Comments