58 विनानोंदणी वाहने ब्लॅकलिस्ट...
वैजापूर, ता.10 - नव्याने कार्यान्वित झालेल्या वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) आपल्या कारभाराची धमक दाखवत 7 नोव्हेंबर रोजी शहरातील अनधिकृत वाहन विक्रेत्यावर मोठी कारवाई केली आहे. शहरानजीकच्या रोटेगाव परिसरात विनापरवाना वाहन विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अशोक ऑटोटेक इंडिया प्रा. लि. च्या वितरकावर तब्बल २ लाख ३२००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय ५८ विनानोंदणी वाहनांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून, या कारवाईमुळे वाहन विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या वाहन विक्रेत्याचा सिल्लोडचा परवाना असताना त्याच नावावर तो वैजापुरात वाहने विक्री करीत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक ऑटोटेक इंडिया प्रा. लि. या वाहन वितरकास वाहन विक्रीची परवानगी सिल्लोड क्षेत्रासाठी दिली होती. मात्र, संबंधित वितरकाने ही परवानगी नजरेआड करून वैजापूर येथेच गेल्या अनेक वर्षांपासून वाहन विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला होता. यामुळे केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे खुलेआम उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. वाहन विक्री व्यवसायासाठी संबंधित क्षेत्रातील आरटीओ कार्यालयाकडून अधिकृत व्यवसाय प्रमाणपत्र (Trade Certificate) घेणे बंधनकारक असते. मात्र, अनेक वितरक कंपनीकडून मंजुरी घेतल्यानंतर इतर शहरांमध्ये परवानगीशिवाय विक्री सुरू करतात, ज्यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसतो आणि कायद्याची पायमल्ली होते. दरम्यान वैजापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विघ्ने यांच्या मार्गदर्शनाखालील आरटीओ पथकाने शहरातील स्टेशन रस्त्यावरील रोटेगावनजीकच्या अरिहंत मोटर्समध्ये सुरू असलेल्या शोरूमवर अचानक छापा टाकला असता तपासणीत कोणताही परवाना न घेता वाहन विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ दंडात्मक कारवाई करत कंपनीवर २ लाख ३२००० दंड ठोठावण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विघ्ने यांच्यासह संदीप येडे (मोटार वाहन निरीक्षक), राजश्री सोळंके (सहायक मोटार वाहन निरीक्षक), विक्रम राजपूत (कार्यालयीन अधीक्षक) व प्रवीण काकडे (वरिष्ठ लिपिक) यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाने ५८ विनानोंदणी वाहनांवर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट केले आहे. दरम्यान नागरिकांनी आपल्या परिसरात विनापरवाना वाहन विक्री होत असल्याचे आढळल्यास तत्काळ वैजापूर आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विघ्ने यांनी केले.
सर्वात मोठी कारवाई !
या कारवाईनंतर वैजापूर परिसरातील नागरिकांत आरटीओच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त होत आहे. अनेकांनी या धडक कारवाईचे स्वागत करत, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर सतत लक्ष ठेवले पाहिजे, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, वाहन वितरक वर्गात मात्र या कारवाईमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई आहे.
अशोक ऑटोटेक इंडिया प्रा. लि.च्या वितरकाचे व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ५८ वाहनांचा ब्लॅकलिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. वैजापूर विभागात विनापरवाना वाहन विक्री करणाऱ्या अन्य वितरकांवरही कठोर कारवाई करण्यात येईल.
- गणेश विघ्ने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वैजापूर
0 Comments