वैजापूर, ता.10 - प्रतिनिधी - दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता.10) एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नाही अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक भागवत बिघोत यांनी दिली. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
वैजापूर नगर परिषदेच्या बारा प्रभागातील 25 जागांसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार असून त्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर तयारी करण्यात आली असून अर्ज स्वीकारण्यासाठी नगरपरिषदेत सहा टेबल लावण्यात आले आहेत. सर्वसाधारण उमेदवारसाठी दोन हजार रुपये व महिला तसेच राखीव उमेदवारांसाठी एक हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तसेच अर्जासोबत अन्य कागदपत्रांसोबत नगरपरिषदेचे बेबाकी प्रमाणपत्र, शौचालय असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असल्याने संभाव्य उमेदवारांनी नगर परिषद कार्यालयात ही कागदपत्रे मिळवण्यासाठी गर्दी केली आहे.
स्थावर व जंगम मालमत्ता, गुन्हेगारी, तिसरे अपत्य याबाबत संबधित उमेदवाराने आयोगाला अर्जसोबत प्रतिज्ञापत्र सादर करायचे असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सहा महिन्याची मुदत देण्यात आली असून त्यांनी जात प्रमाणपत्रबाबत आवश्यक पावती जोडणे आवश्यक आहे.
असा आहे नगरपालिका निवडणूक कार्यक्रम ...
उमेदवारी अर्ज भरणे - 10 ते 17 नोव्हेंबर ( दुपारी 2 पर्यंत)
(रविवार वगळून)
उमेदवारी अर्जांची छाननी - 18 नोव्हेंबर (सकाळी 11 वाजेपासून)
उमेदवारी अर्ज मागे घेणे - 19 ते 21 नोव्हेंबर ( दुपारी 3 वाजेपर्यंत)
उमेदवारांची यादी जाहीर करणे - 26 नोव्हेंबर
मतदान - 2 डिसेंबर (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30)
मतमोजणी - 3 डिसेंबर (सकाळी दहा वाजल्यापासून)
0 Comments