political news, वैजापूर नगरपालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरणार ; तिरंगी लढत होण्याची शक्यता

महायुती दुभंगण्याची शक्यता तर महाविकास आघाडी एकत्र लढणार !
राष्ट्रवादी काँग्रेसची 'मैं इधर जाऊ, या उधर जाऊ' अशी स्थिती 


वैजापूर, ता.10 - नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये युती वा आघाडीबाबत राज्य पातळीवर काहीच चर्चा झालेली नाही. स्थानिक पातळीवर निर्णयांचे अधिकार सर्वच राजकीय पक्षांनी दिल्याने सोयीच्या आघाड्या व समीकरणे जुळण्याची शक्यता आहे. वैजापूर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदावरून महायुती  दुभांगण्याची शक्यता असून भाजप - सेना आमने सामने उभी ठाकणार तर राष्ट्रवादीची 'मैं इधर जाऊ, या उधर जाऊं' अशी स्थिती आहे. महाविकास आघाडी मात्र एकत्र लढणार असे दिसते. 

नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि वैजापुरात राजकीय घडामोडींना वेग आला. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांनी मुलाखती देण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. पालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकांची अकरा प्रभागात 23 पदे तर थेट जनतेतून निवडून येणारे नगराध्यक्षपद होते. 

यावेळी नगरसेवकांची दोन पदे वाढली असून एक प्रभागाची भर पडल्याने 25 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.तर नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार आहे. यावेळी  पालिकेची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असून तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. वैजापूर पालिकेचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव असून शिवसेना शिंदे गटातर्फे आ.रमेश पाटील बोरणारे यांचे धाकटे बंधू संजय पाटील बोरणारे, भाजपकडून माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे प्रकाश चव्हाण यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. या तिघांचीही उमेदवारी निश्चित मानली जात असून या तुल्यबळ उमेदवारांमुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची  होईल यात शंका नाही.

स्थानिक पातळीवर शिवसेना व भाजपचा अपवाद वगळता अन्य राजकीय पक्षांचे फारसे प्राबल्य दिसत नाही. या दोन्हीही पक्षाचे प्राबल्य असले तरी या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सध्या नाराजी असल्याने या निवडणुकीत त्यांच्यात युती होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे शिवसेना व भाजप आमने सामने उभे ठाकणार असे चित्र आहे. शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी नगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले असून त्यानुसार त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेतर्फे आमदार बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आ.बोरणारे यांनी शहर व तालुक्यात केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. तर 20 वर्षे नगरपालिकेची सत्ता ताब्यात असलेले भाजपचे डॉ.दिनेश परदशी या निवडणुकीतही संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे त्यांच्या राजकीय व्युहरचनेवरून दिसून येत आहे. अनेक वर्ष नगरपालिकेची सत्ता ताब्यात असल्याने प्रत्येक मतदारांबरोबर त्यांचा समन्वय आहे. नगरपालिकेची सत्ता ताब्यात ठेवायचीच हा मनाशी निर्धार करून त्यांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (उबाठा) चे प्रकाश चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. 

शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांतर्फे नगरसेवकपदासाठी प्रभावी उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असून इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय उमेदवारही जवळपास निश्चित करण्यात आले असून नगरसेवकपदाच्या संभाव्य उमेदवारांनी आपापल्या प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट असून एक गट शिवसेना पक्षाशी युती करण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरा गट भाजप बरोबर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची "मैं इधर जाऊ, या उधर जाऊं" अशी परिस्थिती आहे.





  


Post a Comment

0 Comments