news today, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्यापासून अंतिम सुनावणी

मुंबई, ता. 11- शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचा ? याबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारपासून (ता.12)  अंतिम सुनावणी होणार आहे.  शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. यासंदर्भातील मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांचे खंडपीठ अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास निवडणूक आयोगाने मुभा दिली होती. आयोगाने 2022 मध्ये दिलेला तो निर्णय असंवैधानिक आणि पक्षपाती आहे .त्यामुळे आयोगाचा तो निर्णय असंवैधानिक व पूर्णपणे पक्षपाती आहे.त्यामुळे आयोगाचा तो निर्णय रद्द करण्यात यावा. अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकरण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निकाली काढण्यास न्यायालय तयार झाले आहे. त्या अनुषंगाने दाखल केलेल्या अंतरिम अर्जासोबत मूळ याचिकेवर बुधवारपासून अंतिम सुनावणी होणार आहे. खंडपीठ दोन्ही बाजूकडील अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे. आवश्यकतेनुसार सलग सुनावणी घेण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी हे प्रकरण अंतिमतः निकाली काढण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments