news today, अखेर ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश

वैजापूर, ता.19 - अखेर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी आणि शहरप्रमुख प्रकाश चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.18) मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला.


नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात युती करण्यासंदर्भात बोलणी होऊन तसा निर्णयही झाला. परंतु न जाणे कुठं माशी शिंकली अन् जागा वाटपावरून ही बोलणी फिसकटली. त्यानंतर भाजपने ठाकरे गटाला गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तालुक्याचे माजी शिवसेना आमदार आर.एम.वाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घेतली व भाजपबरोबर या, तुम्हाला नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा देऊ असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. यासंदर्भात भाजप आणि ठाकरे गट यांच्यात दोनवेळा बैठकही झाली. भाजपकडून आलेला प्रस्ताव वाणी कुटुंबीय आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रकाश चव्हाण यांनी मान्य करून भाजपमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
सोमवारी (ता.17) छञपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी आणि शहरप्रमुख प्रकाश चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह भेट घेतली व प्रवेशाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

त्यानुसार मंगळवारी (ता.18) मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, नंदकुमार जाधव, अनिल न्हावले, देविदास वाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कऱ्हाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय खंबायते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.


Post a Comment

0 Comments