वैजापुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले ...
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसपक्षातर्फे सुभाष गायकवाड यांना उमेदवारी
वैजापूर, ता.19 - वैजापूर नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वैजापूरातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. यावेळी नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. परिणामी, या पदासाठी उमेदवारी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. मागील वीस वर्षांपासून वैजापूर नगर परिषदेत सत्ता राखून असलेले भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशीं व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशीं, शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार रमेश पाटील बोरणारे यांचे भाऊ संजय बोरणारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर सुभाष उत्तमराव गायकवाड (काँग्रेस) यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत.
याशिवाय संपूर्ण राज्याला परिचित असलेले व पाण्यासाठी लढा देणारे माजी आमदार दिवंगत आर.एम.वाणी यांच्या कुटुंबातील सचिन वाणीसह उद्धव सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. या निवडणुकीत भाजपाने महायुतीतील एक घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यापक्षासोबत युती केली आहे. तर शिवसेना स्वतंत्रपणे ही निवडणूक लढत आहे. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हें महाविकास आघाडीत एकत्रितपणे लढत आहेत. मागील अनेक वर्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेवक म्हणून येथील जनतेशी नाळ जोडलेले प्रकाश पंढरीनाथ चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष हाजी अकिल शेख यांनीही भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला असून भाजपासोबत युती केल्यामुळे त्यांच्या वाट्याला 25 पैकी किमान सहा जागा येणार आहेत. त्यामुळे या निवडूकीत अकिल शेख यांची भूमिकाही महत्वाची ठरणार असून त्यांचा पक्षही मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
या राजकीय समीकरणामुळे वैजापूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना, भाजप व महाविकास आघाडी यांच्यात मुकाबला रंगण्याचे संकेत आहेत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात असले तरी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष प्रामुख्याने प्रकाशझोतात आहेत. कारण माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशीं यांच्या नेतृत्वाखाली भाजप व विद्यमान आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगर परिषदेची निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक अधिक अटीतटीची होईल असे दिसते.
0 Comments