वैजापूर, ता.24 - वैजापूर तालुक्यातील बोरसर येथील विनायक साखर कारखान्याच्या मोकळ्या आवारात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर वैजापूर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक छापा टाकून आठ जुगार्यांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून रोख रक्कमेसह मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 52 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांना बोरसर भागात अवैध जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे आणि त्यांच्या पथकाने कारखान्याच्या आवारातील एका लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलीस आल्याची चाहूल लागताच जुगार्यांची पळापळ झाली, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने आठही आरोपींना घटनास्थळीच पकडण्यात यश आले.
अरुण तात्याराव घायवट (वय 49, रा. पानगव्हाण), रामदास तुकाराम त्रिभुवन (वय 62, रा. खंडाळा), साईनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 42, रा. बोरसर), भाऊसाहेब रामभाऊ परदेशी (वय 55, रा. बोरसर), सागर पूजांबा कोल्हे (वय 25, रा. बोरसर), अशोक वसंत चव्हाण (वय 45, रा. बोरसर), बाळासाहेब पोपटराव पवार (वय 51, रा. बोरसर) आणि बाबासाहेब भिवसन पठारे (वय 41, रा. बोरसर) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींच्या अंगझडतीत आणि जुगार खेळण्याच्या जागी रोकड, मोबाईल आणि वाहने मिळून आली. आरोपी अरुण घायवट यांच्याकडून पाचशे रुपयांच्या नोटा आणि एक रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 10,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर रामदास त्रिभुवन यांच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा आणि टेक्नो कंपनीचा मोबाईल असा 12,500 रुपयांचा ऐवज मिळाला. तिसरा आरोपी साईनाथ गायकवाड याच्याकडे रोख रक्कम, रेडमी मोबाईल आणि एक जुनी हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक एम एच 17 बी बी 7484) असा सर्वाधिक 40,200 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. भाऊसाहेब परदेशी यांच्याकडून रोख रक्कम, रेडमी मोबाईल आणि बजाज प्लेटिना मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 20 सी एन 1876) असा 29,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, सागर कोल्हे या तरुण आरोपीकडून पाचशे रुपयाची नोट आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल असा 9,500 रुपयांचा ऐवज मिळाला. अशोक चव्हाण यांच्याकडे सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि बजाज प्लेटिना गाडी (क्रमांक एम एच 20 ए एम 5109) असा एकूण 38,500 रुपयांचा माल मिळून आला. बाळासाहेब पवार यांच्याकडून रोख रक्कम आणि सॅमसंग मोबाईल मिळून 10,500 रुपये, तर बाबासाहेब पठारे यांच्याकडे रोख रक्कम आणि साधा सॅमसंग मोबाईल मिळून 1,700 रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्याचा कॅट आणि इतर जुगाराचे साहित्यही ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण कारवाईत एकूण 1 लाख 52 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाची फिर्याद स्वतः पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांनी दिली आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार शिंदे यांनी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पडळकर हे करत आहेत.
0 Comments