वैजापूर गंगापूर रस्त्यावरील चोरवाघलगाव शिवारातील घटना
वैजापूर, ता. 03 - नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दांपत्यावर काळाने घाला घातला. भरधाव जाणाऱ्या अज्ञात
वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने वृद्ध पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.02) सकाळी आठ वाजेच्या सुमारास वैजापूर - गंगापूर राज्य महामार्गावरील चोरवाघलगाव शिवारात घडली.
मृत दांपत्य हे गंगापूर तालुक्यातील रहिवासी आहे. अलीमोद्दिन करीमोद्दिन सय्यद (वय 53 वर्षे ) व हनिफाबी अलीमोद्दिन सय्यद (वय 46 वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.
शहा पती पत्नी हे मोटारसायकल (एम. एच. 20 एफ.एम. 4380) वर नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी म्हस्की ता.वैजापूर येथे येत होते. त्यावेळी चोरवाघलगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघा पती पत्नीचा जागेवर मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्तेवाहेद पठाण यांनी त्यांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. विरगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सय्यद यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
0 Comments