news today, विरोधी पक्षांनी काढलेल्या ' सत्याच्या' मोर्चावर गुन्हा दाखल

मुंबई, ता.03 - निवडणूक आयोगाविरुध्द विरोधी पक्षांनी मुंबईत शनिवारी (ता.02) काढलेल्या सत्याच्या मोर्चावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परवानगी नसताना मोर्चा काढण्यात आला व प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करण्यात आले, असे कारण देत आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार याद्यातील गोंधळ व मतचोरी विरोधात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांनी दोनवेळा निवडणूक आयोगाची भेट घेऊन पुरावे दिले होते.मात्र आयोगाकडून कोणतीही कारवाई झाली नाही.त्याच्या निषेधार्थ शनिवारी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या सर्वपक्षीय मोर्चासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती.मात्र मोर्चाला परवानगी दिली गेली नाही.त्यानंतरही विराट मोर्चा निघाला. त्यामुळे आयोजकांविरुध्द बेकायदेशीर जमाव गोळा करणे, कायद्याचे पालन न करणे, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याचे नमूद करत आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विरोधकांच्या आक्षेपानंतर भाजपच्या मूक आंदोलनावर गुन्हा ...

सत्याच्या मोर्चाला विरोध करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिवारी मूक आंदोलन केले होते. पोलिसांची परवानगी न घेता हे आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा का नाही , असा प्रश्न विरोधी पक्षांनी केला होता. त्या आक्षेपानंतर या आंदोलनाच्या आयोजकावरही डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments