पालिकेच्या प्रभागांची रचना अत्यंत सदोष असून एका प्रभागातील अनेक मतदार दुसऱ्या प्रभागात असल्याने मतदार शोधतांना उमेदवारांची दमछाक होत आहे.
प्रभागाच्या सीमा आखताना कोणते निष्कर्ष लावले हे पालिकेच्या प्रशासनालाच माहीत, कारण प्रभागाच्या सीमा रेषा या कुठेही चौकोनात नाहीत. उलट दुसऱ्या प्रभागातील काही भाग नागमोडी वळणे घेऊन प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत.एका प्रभागात असणारी नावे दुसऱ्या प्रभागात गेलेली आहेत, आणि हे जवळपास सर्वच प्रभागांमध्ये घडले आहे. मात्र, असे कसे घडले या प्रश्नाला प्रशासनाकडेही उत्तर नाही.
प्रभागाची मतदार संख्या पाहता शेजारच्या प्रभागातील अनेक नावे ही दुसऱ्या प्रभागात आहेत. त्यामुळे मुख्य प्रभागातील उमेदवारांना दुसऱ्या भागात राहणाऱ्या आपल्या मतदारांना संपर्क करणे अवघड जात आहे. निवडणुकीत काही माजी नगरसेवक असले तरी त्यांचा पूर्वीचा भाग आणि आताचा त्यांच्या प्रभागात समाविष्ट झालेला नवीन भाग यामध्ये संपर्काच्या अडचणी आहेत. काहींनी आपल्या प्रभागात भरपूर कामे केली पण दुर्दैवाने त्यांचा भाग तोडला जाऊन दुसऱ्या प्रभागाला मिळाला. त्यामुळे हक्काचे मतदार दुरावले तर नवीन मतदारांशी जुळवून घेणे अवघड जात आहे.मतदार यादीच्या आधारे मतदारांचा शोध घेतला जात आहे .तसेच त्यांना संपर्क करण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होत आहे.
0 Comments