16 नोव्हेंबरला लाडगावात पार पडणार सोहळा
वैजापूर, ता.12 - मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आरक्षणाच्या लढ्यामुळे वैजापूर तालुक्यातील अनेक मराठा समाजबांधवांना कुणबी नोंदी मिळाल्याने जवळपास दहा हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे यांच्या जाहीर भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील लाडगाव येथे येत्या रविवार, 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मंगलबाई सोमवंशी यांच्या शेतजमिनीवर (गट क्र. 196) हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ यांनी दिली. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे तालुक्यातील मराठा समाजातील मुला-मुलींना शैक्षणिक तसेच इतर शासकीय लाभ मोठ्या प्रमाणात मिळत आहेत.
याच निमित्ताने जरांगे पाटील यांच्या कृतज्ञतेच्या भावनेतून तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही मराठा सेवक सदाफळ यांनी सांगितले. त्यामुळे या सोहळ्यास मराठा समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जरांगे यांच्या कार्याला सलाम करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पाच एकर जागेवर पार पडणार भव्य सोहळा
या सोहळ्यात समाजातील विविध मान्यवर, तरुण, महिला वर्ग आणि विद्यार्थी वर्ग हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. भव्य मंच तयार करण्यात येत असून, मंचासमोरील सुमारे पाच एकर जागेची स्वच्छता करण्यात आली आहे. उर्वरित कामेही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सदाफळ यांनी दिली.
0 Comments