वैजापूर, ता.12 - अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपालिका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून वाढत्या थंडीत वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांची चाचपणी व बैठकांनी जोर धरला असून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतांना राजकीय कसब कसोटीला लागणार आहे.
पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी केली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून (ता.10) सुरुवात झाली आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी व माघारीनंतर चिन्ह वाटप झाल्यानंतर अधिकृत प्रचार 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अवघ्या चार दिवसात संपूर्ण प्रभाग पिंजून काढावा लागणार आहे. प्रचारासाठी कमी दिवस मिळत असल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार 10 ते 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 18 नोव्हेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून 25 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार आहे.चिन्ह वाटप झाल्यानंतर
खऱ्याअर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करण्यास सुरुवात करता येते मात्र, चिन्हाविना हा प्रचार करावा लागतो आणि चिन्ह वाटप 26 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत असा चार दिवस प्रचार उमेदवारांना करता येणार आहे. त्यामुळे या चार दिवसात संपूर्ण प्रभाग पिंजून काढवा लागणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी अवघे चार दिवस मिळत असल्याने रात्रीचा दिवस करून उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रचार करतांना उमेदवारांसह कार्यकर्ते आणि नेत्यांची चंगलीच दमछाक होणार आहे.
प्रभागात एकाच पक्षाचे दोन उमेदवार असले तरी दोन्ही उमेदवारांना सर्वच मतदारांपर्यंत पोहचावे लागणार आहे. त्यात अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्ज माघारी हे मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे. माघारीसाठी उमेदवारांचा शोध घेणे, त्यांची मनधरणी करणे अशा परिस्थितीत उमेदवारी माघारीनंतर केवळ पाच दिवस प्रचारासाठी मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारांचा या थंडीतही चांगलाच घाम निघणार आहे.
.
0 Comments