ग्रामपंचायतसह गावकऱ्यांनी निवेदन देऊनही अवैध वाळू वाहतूक बंद होईना
वैजापूर ता.11 - तालुक्यातील बायगाव ग्रुप ग्रामपंचायत (भोकरगाव-बायगाव) येथे शासनाच्यावतीने लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात घरकुल मिळालेले आहे. या घरकुलासाठी शासनाकडून वाळू मिळावी अशी तरतूद देखील केलेली आहे. मात्र असे असतानाही येथील घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने घरकुल बांधणीचे काम लांबणीवर पडत आहे. बांधकाम होत नाही म्हणून येथील ग्रामपंचायतीने पंचायत समितीमार्फत तहसील कार्यालयातील यंत्रणेकडे ग्रामपंयतचा प्रस्ताव दाखल करून लाभार्थ्यांना वाळू प्राप्त करून द्यावी अशी मागणी केलेली आहे.
आरविशेष म्हणजे बायगाव गावापासून शंभर फुटावर शिवना नदी असल्याने येथे भरमसाठ वाळू उपलब्ध आहे, मात्र "धरण उशाला , कोरड घशाला" या म्हणीप्रमाणे वाळू असूनही लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना मोठा मनस्ताप झाला आहे. तर दुसरीकडे मात्र, याच ठिकाणाहून अवैधरित्या वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. ही अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक बंद करण्यासाठी ग्रामपंचायतसह ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊनही प्रशासनाच्यावतीने कोणतीही कारवाई झालेली नाही .अवैद्यरित्या सुरू असलेली वाळू वाहतूक बंद होत नसल्याने ग्रामस्थ मात्र अवाक झाले आहे. प्रशासनाने त्वरित या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैधरित्या सुरू असलेली वाळू वाहतूक बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या भागात वाळू वाहतूक मात्र राजरोसपणे सर्रास सुरू असून वाळू वाहतूक करतांना वाहनधारक वेगाने वाळू घेऊन महामार्गाने घेऊन जात असल्यामुळे महामार्गावरील स्पीड ब्रेकरवर गाडी आदळून त्यातील वाळू महामार्गावर पडून त्यावरून जाणारे टू व्हीलर धारक घसरुन पडतात. त्यातच गाड्यांच्या वाहतूकीमुळे होणारी धूळ ही प्रवाशांना व गावकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.
या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही अवैद्यरित्या होणारी वाळू वाहतूक थांबवावी अशी मागणी प्रवाशासंह गावकऱ्यांकडून होत आहे.
0 Comments