वैजापूर, ता.12 - मागील काही दिवसांपासून वैजापूर शहरात चोऱ्यांचे सत्र वाढले असून या भामट्यानी दुचाकी चोऱ्यानंतर आता बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राना आपले लक्ष्य केले आहे. शनिवारी (ता.10) रात्री चोरट्यांनी शहरातील म्हसोबा चौक येथील व जुन्या बस स्थानक परिसरातील स्वस्तिक टॉवरमधील बँक ऑफ बडोद्याचे दोन ग्राहक सेवा केंद्र फोडून रोख रक्कम पळवली. म्हसोबा चौक येथील ग्राहक सेवा केंद्रातून शटर तोडून रोख रुपये 38 हजार रुपये चोरी झाल्याची तक्रार केंद्राचे मालक भगवान दरेकर (रा. आंनदनगर) यांनी पोलिसात केली आहे. तर स्वस्तिक टॉवरमधील संजय ढोले यांच्या ग्राहक सेवा केंद्रातून तीस हजार रुपये चोरी झाल्याचे या तक्रारीत म्हंटले आहे. याशिवाय संतोषीमाता नगर, फुलेवाडी रोड येथील सविता गायकवाड यांच्याकडेही चोरी झाल्याचे समोर आले आहे.
शहरातील सर्व भागात शनिवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. चोरीच्या घटनेनंतर वैजापूरचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) येथून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तथापि चोरट्याचा माग लागू शकला नाही. फिंगर प्रिंट तज्ञही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments