news today, छञपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सेना - भाजप युती जाहीर

वैजापूर तालुक्यातील शिऊर, वाकला व महालगाव गट भाजपला    भाजप कार्यकर्त्यांचा युतीला विरोध 

छञपती संभाजीनगर, ता.20 - छञपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर वैजापूर तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मात्र, शिवसेना सोबतची युती तोडा अशा घोषणा देत ओबीसी विकास मंत्री अतुल सावे व खासदार भागवत कराड यांच्या गाडीसमोर गोंधळ घातला. त्यामुळे युती झाली असली तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणूक लढविण्याची इच्छा होती हे दिसून आले.

महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढविलेल्या शिवसेना भाजपने जिल्हा परिषदेसाठी मात्र जुळवून घेतले आहे. जिल्हा परिषदेच्या 63 जागांपैकी 52 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून भाजप 27 तर शिवसेना 25 जागांवर निवडणूक लढणार आहे. युती संदर्भात दोन दिवसांपासून पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, आ. रमेश बोरनारे, आ. संजय के, आ. विलास भुमरे, आ. संजना जाधव या शिवसेना - भाजप नेत्यांमध्ये बैठकीचे सत्र सुरू होते. अखेर आज युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. असे असले तरी 11 जागांचा तिढा कायम आहे. या जागांचा निर्णय पक्षश्रेठी घेणार आहेत. 
काल भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयात कार्यकर्त्यांनी शिवसेनेबरोबर युती नको अशी भूमिका नेत्यांसमोर मांडली होती.परंतु पक्षश्रेष्ठींकडून युती करण्याच्या सूचना आल्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत झाला तसा गोंधळ टाळत वाद असलेल्या जागांचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडून एकमत झालेल्या जागांवर युती जाहीर करण्यात आली आहे.

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार गैरहजर...
शिवसेना - भाजप युतीसाठीच्या बैठकीकडे सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार फिरकलेच नाहीत. सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात आपण स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.



Post a Comment

0 Comments