मुंबई, ता.28 - आज सकाळी बारामतीत लँडिंगवेळी प्लेन क्रॅश होऊन झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांसह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अजित पवार आज सकाळी मुंबईहून एका खाजगी विमानाने (Lear Jet 45) बारामतीकडे रवाना झाले होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बारामतीत चार जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी साधारण 8 -45 च्या सुमारास विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला.
प्राथमिक अहवालानुसार लँडिंगच्या वेळी विमानाला तांत्रिक अडचण आली, ज्यामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीच्या बाजूला जाऊन आदळले आणि त्यानंतर विमानाने भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या विमानात अजित पवारांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि चालक दलाचे सदस्य असे एकूण पाच जण होते. या पाचही जणांचा या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले, मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की कोणाचेही प्राण वाचवता आले नाहीत.
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर शोककळा पसरली आहे. राजकारणातील एक कणखर नेतृत्व' म्हणून ओळखले जाणारे दादा अशा प्रकारे अचानक एक्झिट घेतील, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
प्रशासन आणि नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) द्वारे या अपघाताची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
0 Comments