news today, वैजापुरात 24 जागांसाठी 183 उमेदवार रिंगणात ; गटातून 66 तर गणांतून 82 जणांची माघार

वैजापूर, ता. 27  - पाच फेब्रुवारीला होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या 331 उमेदवारी अर्जापैकी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गट व गणातून अनुक्रमे 66 व 82 अशा 148 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील आठ जागांसाठी 79 तर पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी 104 असे 183 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. 

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत येथील पंचायत समितीच्या नामनिर्देशन कक्षात 22 जानेवारीला अर्जाची छाननी झाल्यानंतर जिल्हा परिषदेसाठी 145 व पंचायत समितीसाठी 186 नामनिर्देशनपत्र वैध ठरवण्यात आले होते. 22 जानेवारीपासून आज अखेरपर्यंत 148 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
वाकला गटातून राष्ट्रवादीचे शिल्पा विशाल शेळके, सुरेखा उत्तम निकम, सुवर्णा बाळासाहेब भोसले, यांच्यासह 15 जणांनी माघार घेतली बोरसर मधून रामहरी जाधव, पार्वतीबाई जाधव यांच्यासह 14, शिऊर मधून गोकुळ आहेर, सुरज पवार यांच्यासह सहा, संवंदगाव गटातून मीराबाई साईनाथ मतसागर, जयश्री नारायण कवडे, छाया राधाकिसन थोट यांच्यासह आठ, लासूरगाव गटातून वैशाली कल्याण दांगोडे,मिसाळ सिनाबाई मनाजी, वर्षा नंदकिशोर जाधव, स्वाती अनिल वाणी, लहानुबाई सारंगधर डिके आदी सात, घायगाव गटातून रेणुका मंजाहरी गाढे, सचिन रंगनाथ वाणी, संकेत देविदास वाणी यांच्यासह सात, वांजरगाव गटातून दोन व महालगाव गटातून प्रताप निंबाळकर यांच्यासह सात जणांनी माघार घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांच्यावर अन्याय झाला अशी चर्चा समर्थकांमध्ये आहे. त्यांच्या पत्नी शिल्पा विशाल शेळके यांनी वाकला गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आज त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. वाकला सर्कलमध्ये त्यांनी प्रभावी व लोकाभिमुख कार्य केले आहे. त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे परिसरातून पक्ष श्रेष्ठी वर नाराजी व्यक्त होत असल्याची  चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

युतीला तडे ; भाजपचा सवंदगाव गटात व गणात अपक्षांना पाठिंबा...

तालुक्यातील संवदगांव गटातून अपक्ष उमेदवार प्रीती गणेश इंगळे व जरुळ गणातून सुरेश वाल्मीक राऊत व सवंदगाव गणातून अचल भागिनाथ बागुल यांना भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे.


Post a Comment

0 Comments