छत्रपती संभाजीनगर, ता.14 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यासंदर्भात जिल्ह्यात राबवावयाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत बुधवारी (ता.१४) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीने आढावा घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचेता शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आश्विनी लाठकर, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी विद्याधर शेळके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी निवडणूक यंत्रणा, मनुष्यबळ उपलब्धता, मतदान यंत्रे उपलब्धता, जिल्हा पातळीवर स्थापित करावयाचे कक्ष, तालुका पातळीवर स्थापित करावयाचे कक्ष, प्रतिबंधात्मक कारवाई, कायदा सुव्यवस्था याबाबत आढावा घेतला.
असा आहे निवडणूक कार्यक्रमः-
या निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशन पत्र दाखल करणे- शुक्रवार दि.१६ ते मंगळवार दि.२१ जानेवारी २०२६. नामनिर्देशन पत्र छाननी- बुधवार दि.२२ जानेवारी २०२६ (सकाळी ११ वा. पासून) त्यानंतर लगेचच वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी माघारी- दि.२३, दि.२४ जानेवारी व दि.२७ जानेवारी २०२६ सकाळी ११ ते दुपारी ३ वा. पर्यंत.
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसुद्धी- मंगळवार दि.२७ जानेवारी दुपारी साडेतीन वा. नंतर
मतदान- गुरुवार दि.५ फेब्रुवारी २०२६ सकाळी साडेसात ते सायं. साडेपाच वा. पर्यंत. मतमोजणी-शनिवार दि.७ फेब्रुवारी सकाळी १० वा. पासून.
संबंधित क्षेत्रात आचारसंहिता ...
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. संबंधित क्षेत्रात ही आचारसंहिता लागू झाली असली तरी अन्य ठिकाणीदेखील संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही; परंतु नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल.
दोन मते देणे अपेक्षित ...
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. त्यामुळे एका मतदाराने दोन मते देणे अपेक्षित असते.
तालुकानिहाय मतदार संख्या याप्रमाणे-
सोयगाव - पुरुष-४५९७१, स्त्री-४१७७५ इतर- १, एकूण-८७७४७
सिल्लोड- पुरुष-१२९८६५, स्त्री-११९००८ इतर- १, एकूण-२४८८७४
कन्नड- पुरुष-१३५५५३, स्त्री-१२२५२३ इतर- ४, एकूण-२५८०८०
फुलंब्री- पुरुष-६६७५१, स्त्री-६१०७१ इतर- १, एकूण-१२७८२३
खुलताबाद- पुरुष-४४४५३, स्त्री-४०८५३ इतर- १, एकूण-८५३०७
वैजापूर- पुरुष-११६९४३, स्त्री-१०७००४ इतर- ०, एकूण-२२३९४७
गंगापूर- पुरुष-१५५२०६, स्त्री-१४२५४४ इतर- १४, एकूण-२९७७६४
छत्रपती संभाजीनगर- पुरुष-१५५२२४ स्त्री-१४०५२७ इतर- १५, एकूण-२९५७६६
पैठण- पुरुष-१२९२६८, स्त्री-११८४७३ इतर- ४, एकूण-२४७७४५
जिल्ह्यात एकूण ९ लाख ७९ हजार २३४ पुरुष , ८ लाख ९३ हजर ७७८ स्त्री तर ४१ इतर असे एकूण १८ लक्ष ७३ हजार ०५३ मतदार आपल मतदानाचा हक्क बजावतील.
नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने ...
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्यावेळी ऑनलाईन पद्धतीने नामर्निर्देशनपत्रे व शपथपत्रे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन या निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने नामर्निर्देशनपत्रे व शपथपत्रे स्वीकारण्यात आली. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आले होते. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही आता ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देनपत्रे स्वीकारण्यात येतील.
‘
जातवैधता पडताळणी बाबत ...
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.
६३ गट आणि १२६ गणांमध्ये होणार निवडणूक ...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदचे ६३ गट आणि पंचायत समितीचे १२६ गण क्षेत्रात होणार आहे. तालुकानिहाय गट व गणांची संख्या याप्रमाणे- सोयगाव-३ गट, ६ गण, सिल्लोड-९ गट, १८ गण, कन्नड-८ गट, १६ गण, फुलंब्री ४ गट, ८ गण, खुलताबाद-३ गट, ६ गण, वैजापूर-८ गट, १६ गण, गंगापुर-९ गट, १८ गण, छत्रपती संभाजीनगर १० गट, २० गण, पैठण ९ गट, १८ गण असे एकूण ६३ गट व १२६ गण आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय एक निवडणूक निर्णय अधिकारी व एक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहतील. एकूण२२८२ मतदान केंद्रांवर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. तालुकानिहाय मतदान केंद्र संख्या याप्रमाणे- सोयगाव-११३, सिल्लोड-३०५, कन्नड-३१७, फुलंब्री-१५५, खुलताबाद-१०४, वैजापूर-२८१, गंगापूर-३४७, छत्रपती संभाजीनगर-३५४, पैठण-३०६.
0 Comments