कार्यशाळेला अभूतपूर्व प्रतिसाद ...
वैजापूर, ता.09 - शब्दांच्या पाठीमागील विचार समजून घेण्याची, लेखनाला केवळ अभिव्यक्ती न ठेवता वैचारिक जबाबदारी देण्याची आणि नवोदित लेखन प्रवासाला दिशा देण्याची भूमिका बजावणारी एकदिवसीय नवोदित लेखक कार्यशाळा विनायकऱाव पाटील महाविद्यालय, वैजापूर येथे उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विनायकऱाव पाटील महाविद्यालय यांच्यातर्फे आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे होते. उद्घाटन विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ. कैलास अंभुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील मराठी भाषा संकुलाचे कवी डॉ. पी. विठ्ठल यांनी केलेल्या बीजभाषणाने नवोदित लेखकांना वैचारिक आत्मभान दिले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात “मी आणि माझी कविता” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कवी धनंजय गव्हाले, निलेश चव्हाण, धम्मपाल जाधव, अविनाश भारती आणि कवयित्री गुंजन पाटील यांनी आपले लेखनानुभव मांडले आपल्या कवितांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिरुद्ध मोरे (सिल्लोड) होते. परिसंवादात कवितेतील आत्मशोध, सामाजिक भान आणि समकालीन जाणिवा यांवर सखोल चर्चा करून वक्त्यांनी विविध कवितांचे सादरीकरण करून रसिकांना अंतर्मुख केले.
दुपारी आयोजित कविसंमेलन हे कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. निमंत्रित व नवोदित कवींनी सादर केलेल्या कवितांनी सभागृहात शब्दांची ऊर्जा निर्माण केली. नव्या आशयाचे, अनुभवप्रधान आणि संवेदनशील लेखन श्रोत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. कार्यशाळेचा समारोप समारंभ प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाने झाला. यावेळी मान्यवरांनी नवोदित लेखकांनी सातत्याने वाचन, चिंतन आणि प्रामाणिक लेखन साधना करावी, असा सल्ला दिला.
या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. ललित अधाने यांनी प्रास्ताविक केले. सहसमन्वयक व आयोजन समितीतील डॉ. जयप्रकाश चोरघडे, डॉ. राजेश कोळेकर, संतोष तुपे, संभाजी जाधव, बाबासाहेब निमसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य उल्हास ठोंबरे, उपप्राचार्य डॉ. संदीप परदेशी, डॉ. डि.के. ढमाले, कवी दत्तात्रय ठुबे, अहेमद पठाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
0 Comments