news today, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफीची शक्यता ; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता..

मुंबई, ता.24 - राज्यातील लाखो शेतकऱ्यांकडे सद्य:स्थितीत बँकांची जवळपास 36 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. या अडचणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी केला जाणार आहे. कर्जमाफी व दीर्घकालीन उपाययोजनांची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होईल अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होण्याची शक्यता असून त्यापेक्षा अधिकच्या कर्जफेडीसाठी मुदत देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात मागील पाच वर्षांपासून दररोज सरासरी सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या अहवालात नमूद आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे या विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत. नापिकी, पिकांना हमीभाव नाही, अतिवृष्टी, महापूर व दुष्काळामुळे थकबाकीत गेलेल्या लाखो शेतकऱ्यासाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार असून, त्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मार्चअखेर समितीचा अहवाल शासनाला सादर होईल.तत्पूर्वी, शेतकऱ्यांना राज्यसरकार कर्जमाफीतून मोठा दिलासा देणारं आहे. पण थकबाकीची रक्कम पाहता सातबारा कोरा होणार नाही. हे निश्चित मानले जात आहे.

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकासह खासगी व राष्ट्रीयीकृत बँकाकडील 30 जून व 30 सप्टेंबर या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे.पुढील चार पाच दिवसांत सर्व माहिती प्राप्त होईल. त्यानंतर एकत्रित माहिती शासनाला सादर होईल.त्यानंतर मंत्रिमंडळात निर्णय होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय जाहीर करतील, असे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले. यंदाच्या कर्जमाफीत 3 लाखापर्यंतचे कर्ज माफ होण्याची शक्यता असून त्यापेक्षा अधिकच्या कर्जफेडीसाठी मुदत देण्यात येणार आहे. तसेच पाच वर्षातील नियमित कर्जदारांना 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान, एकरकमी परतफेड योजनेतून कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज देण्यात येणार आहे. 

वैजापूर तालुक्यातील 8 हजार 682 शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेची 34 कोटी रुपयांची थकबाकी ...
---------------------------------------------------------

वैजापूर तालुक्यात एकूण 30 हजार 485 कर्जदार शेतकरी असून 129 कोटी 90 लाख 47 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यापैकी 8 हजार 682 शेतकरी थकबाकीत असून 34 कोटी 85 लाख 67 हजार रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे.

Post a Comment

0 Comments