राज्यात इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नाही - अन्न व नागरी पुरवठा विभाग
वैजापूर, ता.25 - वैजापूर शहरातील पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळपासूनच पेट्रोल भरून घेण्यासाठी वाहनधारकांनी रांगा लावल्याचे चित्र बघायला मिळाले. शिर्डी, श्रीरामपूर येथे पेट्रोल संपल्याने वैजापूर येथेही पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्याने मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची खरेदी झाली व त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील पेट्रोल पंपावरील साठा संपत आला. परिणामी बुधवारपासून तर पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गरज नसतांना ग्राहकांनी उगीचच मोठ्या प्रमाणावर पेट्रोल खरेदी करू नये, पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे असे आवाहन पेट्रोल पंप चालकांनी केले आहे.
वैजापूर शहरात हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल (आयओसी) व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या कंपन्यांचे प्रत्येकी दोन तसेच नायरा व रिलायन्सचा प्रत्येकी एक असे सात पेट्रोल पंप आहेत. या सर्व पंपावर मुबलक प्रमाणावर पेट्रोल साठा होता. मात्र, खरेदी वाढल्यामुळे यातील काही पंपावरील साठा संपला. त्यामुळे वाहन धारकांनी आपला मोर्चा दुसऱ्या पंपावर वळवत खरेदी केली. त्यामुळे क्रमांक्रमाने पंपावरील पेट्रोल संपले. त्यातच अफवेची भर पडल्याने वाहनांची पेट्रोल पंपावर एकच गर्दी झाली.तथापि पुढील काही दिवसातच पेट्रोलचा स्टॉक आल्यानंतर पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.
अचानक पेट्रोल संपल्याची अफवा झाल्याने तसेच शेजारच्या शिर्डी, श्रीरामपूर येथे पेट्रोल शिल्लक न राहिल्याने वाहचालकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली. त्यामुळे काही पेट्रोल पंपावरील साठा संपला होता. मात्र, काही दिवसातच पेट्रोल स्टॉक उपलब्ध झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल "
अनंत बोडखे, अध्यक्ष, पेट्रोल, डिझेल संघटना वैजापूर
राज्यात इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नाही - अन्न व नागरी पुरवठा विभाग
राज्यातील इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या — हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसीएल) - यांच्या माध्यमातून राज्यभर इंधनाचे वितरण नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करू नये. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच, इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून यावर नागरिकांनी विश्वास ठेवावा. कोणतीही शंका किंवा माहिती जाणून घेण्यासाठी केवळ अधिकृत शासकीय माध्यमांवरच अवलंबून राहण्याचे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
0 Comments