news today, कांद्याला भाव मिळेना ; वैजापुरात संतप्त शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आ.बोरणारे यांना निवेदन ...

वैजापूर, ता.24 - कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता मुंबई नागपूर महामार्गावर गंगापूर चौफुलीवर चक्का जाम आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. बाजारात कांद्याचे दर घसरल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने  सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येत रस्त्यावर उतरले आणि जवळपास अडीच तास वाहतूक ठप्प केली.

सकाळपासूनच विविध गावांतील शेतकरी ट्रॅक्टर, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह आंदोलनस्थळी जमा झाले होते. हातात फलक घेऊन त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “कांद्याला हमीभाव द्या”, “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “उत्पादन खर्चावर आधारित दर द्या”,एकच पक्ष कांद्यावर लक्ष अशा घोषणा देत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. काही शेतकऱ्यांनी कांद्याचे ट्रक्टर  आंदोलनस्थळी खाली ओतून येऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
कांद्याला एक हजार रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान देण्यात यावे.सरकारी खरेदी सुरू करावी.अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कांदा पिकांचे पंचनामे करावेत.आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.आंदोलनाचे नेतृत्व गणेश तांबे यांनी केले.
महामार्गावर चक्का जाम झाल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
शेतकऱ्यांनी सांगितले की, कांद्याचे पीक घेण्यासाठी बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक यावर मोठा खर्च झाला आहे. मात्र बाजारात मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तहसीलदार सुनील सावंत यांनी आंदोलनकर्त्यांची निवेदने स्वीकारून त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळाने आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. कांद्याच्या प्रश्नावर तातडीने निर्णय न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिक्रिया ...

बाजार समितीत काही दिवसांपासून कमीत कमी दीड रूपये किलो व जास्तीत जास्त आठ रुपये किलो दर मिळत आहे.
रासायनिक खते,फवारणीची औषधे, मशागत, मजुरीचे दर वाढले आहे.त्यातच कांद्याला कमी भाव मिळत असल्याने खर्च देखील निघत नाही.
गोरख आहेर, शेतकरी नगिना पिंपळगाव 

कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने खर्च केलेला पैसा निघणार नसल्याने शेतातच कांदा पिक सोडून दिले आहे.
बाळासाहेब परदेशी, शेतकरी विरगाव 

अवकाळी पावसाने कांदा खराब झाला आहे.तो साठवणूक योग्य राहीला नाही.त्यामुळे मिळेल त्या भावाने विक्री करत आहे.५ ते ६ रुपये किलो दर मिळत आहे.
ज्ञानेश्वर आधुडे, शेतकरी पोखरी 

Post a Comment

0 Comments