news today, वैजापुरात डिझेल टंचाईचा उडाला भडका ; बेफिकीर प्रशासन अन् बेहाल नागरिक

पेट्रोल पंपावर 'नो स्टाॅक'चे झळकले फलक ! 

वैजापूर, ता.22 -  शहरासह तालुक्यात विविध डिझेलपंपावर इंधन भरण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या असून टंचाईचा भडका उडाल्याने वाहनचालक सैरभैर झाले आहेत. एकीकडे प्रशासन म्हणते की कोणतीही इंधन टंचाई नाही तर दुसरीकडे डिझेलपंपावर 'नो स्टाॅक'चे फलक झळकले आहेत. त्यामुळे खरी परिस्थिती काय? याचा काहीच अंदाज लागेना. परंतु वाहनचालकांना इंधन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एवढे मात्र खरे! अशीच परिस्थिती मार्च महिन्यात उद्भवली होती. दरम्यान प्रशासनाची बेफिकिरी, कागदी घोडे नाचवणे व कोणतीही ठोस माहिती नसणे आदी बाबींमुळे नेमकी परिस्थिती काय आहे? हे कळायला मार्ग नाही.

दरम्यानच्या काळात अमेरिका - इस्त्राईल व इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे अफवांचे पेव फुटून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आगामी काळात इंधनटंचाई होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या तीन दिवसांपासून 
शहरासह तालुक्यातील विविध पेट्रोल व डिझेलपंपावर इंधन भरण्यासाठी एकच झुंबड उडाली. बहुतांश पंपावर 'नो स्टाॅक'चे फलक झळकले तर अपवाद वगळता काही ठिकाणी नाममात्र इंधन वितरण सुरू आहे. परंतु असे असले तरी सद्यस्थितीत कोणतीही इंधनटंचाई नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे.‌ डिझेल भरण्यासाठी पंपावर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. वास्तविक पाहता प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोणतीही टंचाई नाही, असे असले तरी शहरासह तालुक्यातील बहुतांश पंपावर 'नो स्टाॅक'चे फलक झळकले आहेत. गुरुवारी बहुतांश पंपावरील इंधनसाठा संपून गेला. शहर व परिसरात जवळपास १० पंप आहेत. तालुक्यात ३५ पेक्षा अधिक पंप आहेत. ग्रामीण भागातही कमीअधिक अशीच परिस्थिती आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे 'नो स्टाॅक'चे फलक झळकले असल्याचे पंपचालकांचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई निर्माण झालेली नाही अथवा याबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मग तरीही इंधनटंचाई का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ढिसाळ व नियोजनशून्य कारभार ...

 दरम्यान शहर व तालुक्यातील नागरिक इंधनटंचाईमुळे सैरभैर झालेले असताना दुसरीकडे प्रशासन टंचाई नसल्याचा छातीठोकपणे दावा करीत सुस्त आहेत. केवळ एका ठिकाणी बसून कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे. तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहर व तालुक्यात फेरफटका मारून इंधनाची काय स्थिती आहे? याचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. केवळ सरकारी उत्तरे देण्यात प्रशासन धन्यता मानत आहे. प्रशासनाच्या बेफिकीराचा फटका वाहनचालकांसह शेतकऱ्यांना बसत आहे. ढिसाळ व नियोजनशून्य कारभार, अधिकाऱ्यांची बेफिकिरी, केवळ बसल्या ठिकाणी राहून कागदी घोडे नाचवणे आदी बाबी नागरिकांना नाहक त्रासदायक ठरत आहे. खरी परिस्थिती काय आहे? याबाबत प्रशासनाकडून माहिती समोर येत नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. 


दुष्काळात तेरावा महिना ...

मालवाहू वाहने, कार अन्य वाहनचालकांबरोबरच ट्रॅक्टरचालकांना डिझेल टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या खरिप हंगामपूर्व मशागतीची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांना नांगरणीसह अन्य मशागतीसाठी डिझेलची आवश्यकता आहे. परंतु टंचाई निर्माण होऊन ऐन दुष्काळात तेरावा महिना झाल्यासारखी परिस्थिती झाली आहे. विशेषतः डिझेलपंपावर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहे.

वैजापूर शहर अथवा तालुक्यात कोणतीही इंधनटंचाई नाही. सर्व ठिकाणी मुबलक इंधन उपलब्ध आहे. परंतु तरीही माहिती घेऊन सांगतो.
- प्रवीण काकडे, नायब तहसीलदार, वैजापूर 
-

Post a Comment

0 Comments