news today, बाभुळगाव गंगा गोळीबार प्रकरणी एकाला अटक ; दोन पोलीस निलंबित

वैजापूर, तर.03 - तालुक्यातील गंगथडी भागातील बाभुळगांव गंगा येथे वाळू तस्करांच्या दोन गटात काही दिवसांपूर्वी वाद होऊन झालेल्या गोळीबार प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वीरगाव पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. 

महेश विजय गायकवाड (वय 36 वर्ष, रा.कोकमठाण ता. कोपरगांव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पुणे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेची दखल घेऊन या प्रकरणी दोन पोलिसांना पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. बाभुळगाव गंगा येथे मध्यरात्री गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करांमध्ये वाद होऊन झालेल्या गोळीबार प्रकरणात नऊ जणांविरुद्ध वीरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वीरगाव पोलिसांनी पुणे येथे नातेवाईकाकडे लपून बसलेल्या महेश गायकवाड यास ताब्यात घेतले असून या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी बाभुळगाव गंगा येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून वाळू तस्करांशी संबंध असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या राहुल गायकवाड व समाधान दुबिले या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments