news today, विवाहित महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ वायरल ; युवकाविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल

वैजापूर, ता. 02 - तालुक्यातील एका 22 वर्षीय विवाहित महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 1 जुलै रोजी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची काही दिवसांपूर्वी  संबंधित संशयित युवकासोबत ओळख झाली होती. या ओळखीच्या काळात त्याने महिलेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ तयार करून ठेवले होते. त्यानंतर महिलेचा विवाह झाल्यानंतरही आरोपी तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत होता.

मात्र, महिलेने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने "तु माझ्याशी बोल, अन्यथा तुझे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन," अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून महिलेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय आरोपीने महिलेस वारंवार फोन करून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सततच्या धमक्या, अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करणे आणि मानसिक त्रासामुळे पीडित महिला प्रचंड तणावाखाली गेली होती. अखेर तिने वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत सविस्तर तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे वैजापूर पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध विविध कायदेशीर कलमान्वये गुन्हा नोंदविला असून, बनावट इन्स्टाग्राम खाते, व्हायरल करण्यात आलेले फोटो-व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments