vaijapur news ग्रामसेवकास मारहाण ; दोघां आरोपींना दोन वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा

वैजापूर, ता.29/प्रतिनिधी - 
वैजापूर: माहितीचा अधिकार अन्वये ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांची माहिती आजच द्या असे म्हणून ग्रामसेवकास अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोघा आरोपींना दोन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंडाच्या रकमेपैकी १० हजार रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून द्यावी असे आदेश सहायक सत्र न्यायाधीश एल.जी.पाच्छे यांनी दिले. उदय काशिनाथ सोनवणे (३४) रा. खरज आणि हमीद अहमद जिलानी (३१) रा.  वैजापूर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी कृष्णा नामदेव किरवे हा मौजे खरज येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होता. दि. २४- १२- २०२१८ रोजी दुपारी १२: ३० वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालय वैजापूर येथे टँकर प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आला होता. त्यावेळी आरोपी उदय याने फिर्यादीस फोन करून सभापतीच्या चेंबर मध्ये बोलावले त्यावेळी उदय व दुसरा आरोपी भाजप शहराध्यक्ष हमीद जिलानी यांनी फिर्यादीस कॉलर धरून चेंबरमधे ओढले. त्यानंतर आरोपी उदय याने फिर्यादीस माहितीचा अधिकार अन्वये ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांची माहिती आजच द्या अशी मागणी केली त्यावेळी फिर्यादीने आपणास माहिती मुदतीत आपणास मिळून जाईल असे उत्तर दिले आणि माहिती अधिकाराचा अर्ज स्वीकारून आरोपीस पोहोच दिली. त्यानंतर आरोपी उदय फिर्यादीस म्हणाला की, तू माहिती तर देशीलच तु सरपंचाचे ऐकतोस असे म्हणून आरोपींनी फिर्यादीस चापट बुक्क्यांनी जबर मारहाण करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच येथून पुढे आमचे म्हणणे ऐकले नाही तर नौकरी कशी करतो व गावाकडे जिवंत कसा जातो अशी धमकी देऊन फिर्यादीचे हातातून पिशवी हिसकावून त्यातील कागदपत्र फाडले व बॅगमधे टाकले फिर्यादी हा झालेल्या मारहाणीमुळे तेथेच भुरळ येऊन पडला अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे वैजापूर येथे भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ आणि सह कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी भगवान डांगे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
प्रकरणातील फिर्याद, साक्षीपुरावा आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. जी. सी. मंझा यांनी केलेला मुद्देसुद युक्तीवाद ग्राह्य धरून दोघा आरोपींना कलम ३५३ प्रमाणे दोन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ३२३ प्रमाणे तीन महिने साधा कारावास व पाच हजार रुपये दंड दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा तसेच दंडाच्या रकमेतून दहा हजार रुपये फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून द्यावी असे आदेश सहायक सत्र न्यायाधीश श्री. एल. जी. पाच्छे यांनी दिले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी. सी. मंझा आणि सहायक सरकारी अभियोक्ता कृष्णा गंडे यांनी काम पाहिले. पैरवी म्हणून सागर विघे यांनी सहाय्य केले.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले तर बचाव पक्षातर्फे स्वतः आरोपी उदय सोनवणे यास तपासण्यात आले त्यात बचाव पक्ष आपला बचाव सिद्ध करू शकला नाही.

Post a Comment

0 Comments