कर्जाची उर्वरित रक्कम पावसाळी अधिवेशनात मंजूर
2 हजार 87 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
वैजापूर, ता.05 / प्रतिनिधी -
श्री रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेतील ६४ कोटी २७ लाखांचे थकीत कर्ज राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडे वर्ग केले. ही रक्कम दोन टप्प्यांत दिली. त्यामुळे योजनेला शंभर टक्के निधी मिळाला.
१९९३-९४ मध्ये काँग्रेसचे दिवंगत खासदार रामकृष्ण पाटील यांनी १४ गावांतील ८ हजार ९३४ एकर जमीन तारण ठेवून जिल्हा बॅंकेकडून ६४ कोटींचे कर्ज घेतले होते. गोदावरी नदीचे पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे या गावांमध्ये आणले गेले. नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे योजना आर्थिक अडचणीत आली. कर्ज व व्याज मिळून रक्कम २०९ कोटी २७ लाखांवर पोहोचली. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बॅंकेचे कर्ज दाखवले गेले. २०१९ च्या निवडणुकीत आमदार रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले. २२ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ताबदलात बोरनारे यांनी या योजनेच्या कर्जमाफीच्या अटीवर पाठिंबा दिला. त्यानंतर राज्य शासन व जिल्हा बॅंकेत तडजोड झाली. बॅंकेला मूळ ६४ कोटी २७ लाखांची रक्कम देण्यात आली. बॅंकेने १४५ कोटींचे व्याज माफ केले. पहिल्या टप्प्यात ६३ कोटी ६७ लाखांचा निधी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाला. तो २० मार्च २०२५ रोजी बॅंकेकडे वर्ग झाला. उर्वरित ६० लाखांची रक्कम पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत मंजूर झाली. ही माहिती आमदार बोरनारे यांनी दिली. जिल्हा बॅंकेचा ताळेबंद ३१ मार्च रोजी पूर्ण झाला.
बोजा उतरण्याची प्रक्रिया लवकरच
सहाय्यक सहकार निबंधकांमार्फत तहसीलदारांकडे शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २ हजार ८७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
0 Comments