crime, फोन पे वरून 15 हजारांची लाच स्वीकारली ; जिल्हा होमगार्ड कार्यालयातील लिपिक अटकेत

छञपती संभाजीनगर, ता. 03/प्रतिनिधी -
औषधोपचाराचे बील व सानुग्रह अनुदान  मंजूर करण्यासाठी 15 हजारांची लाच फोन पे वरून स्वीकारताना जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील प्रमुख लिपिक सोपान पंडितराव टेपले (वय 41 वर्षे, रा.छत्रपती संभाजीनगर) यांस लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 03) पकडले. 
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांचे वडील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय येथे होमगार्ड पदावर कार्यरत होते. त्यांचे औषध उपचारादरम्यान एम.जी.एम हॉस्पिटल येथे निधन झाले. त्या उपचाराचे बिल व सानुग्रह अनुदान मंजूर होऊन मिळण्याकरीता तक्रारदार यांनी कायदेशीर अर्ज केलेला होता. 

तक्रारदार महिला यांचे वडिलांचे औषध उपचाराचे बिल व सानुग्रह अनुदान मंजुरी बाबत फाईलची माहिती विचारण्यासाठी तक्रारदार महिला ही जिल्हा होमगार्ड कार्यालयातील मुख्य लिपिक सोपान टेपले यांच्याकडे गेली असता टेपले यांनी त्यांच्याकडे 20,000 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

बुधवारी (ता. 02) रोजी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची तक्रारदार व पंच यांच्या समक्ष आरोपी सोपान पंडितराव टेपले यांच्याकडे पाठवून पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदार महिला यांच्याकडे 20,000/- रुपये  रकमेची मागणी करून तडजोडीअंती फोन पे वरून 15,000 हजार रुपये पाठवण्याचे सांगितले. तक्रारदार महिला यांच्या फोन पे मध्ये पैसे कमी असल्याने त्यांनी उद्या पैसे टाकते असे सांगितले. ठरल्याप्रमाणे तक्रारदार महिला यांनी गुरुवारी (ता.03) लिपिक सोपान टेपले यांचे फोन पे वर 15,000 हजार रुपये पाठवून टेपले यांना फोन करून पैसे आल्याची खात्री करण्यास सांगितले असता, त्यांनी पैसे आल्याची खात्री केली. त्यावरून लिपिक सोपान टेपले यांना जिल्हा होमगार्ड कार्यालयातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपी टेपले यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे  रेडमी कंपनीचा मोबाईल, एक पाकीट त्यामध्ये कॅनरा व एच.डी.एफ.सी. बँकेचे एटीएम कार्ड मिळून आले. आरोपी टेपले यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे.
 या प्रकरणी पोलीस ठाणे सिटी चौक, छत्रपती संभाजीनगर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू बी. नागलोत, पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र सिनकर, साईनाथ तोडकर, सी. एन. बागुल यांच्य पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments