व्यापारी संकुलाची आठ गाळे जमीनदोस्त, लाखोंचे नुकसान
कन्नड ता.04/प्रतिनिधी -
शहरातील अत्यंत गजबजलेल्या व रहदारी असलेल्या कन्नड नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाची इमारत गुरुवारी ( ता.03) दुपारी अचानक कोसळली. या घटनेत आठ गाळे जमीनदोस्त झाले असून वीस गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तहसील कार्यालयासमोरच नगरपालिकेला लागून असलेली व्यापारी संकुलाची ही इमारत दोन टप्प्यात बांधण्यात आली होती. दोन मजली असलेल्या या इमारतीत पहिल्या टप्प्यात खालच्या भागात 20 गाळ्यांचे बांधकाम 1980 - 81 साली करण्यात आले. तर 2005-06 मध्ये दुसऱ्या टप्प्यात वरच्या मजल्यावर आठ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले होते. या व्यापारी संकुलातील एकूण 38 गाळे नगरपालिकेने भाडे तत्त्वावर दिलेले आहेत.
व्यापारी संकुलाची ही इमारत असुरक्षित व धोकादायक असल्यामुळे केंव्हाही कोसळू शकते म्हणून नागरिकांनी मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्याकडे मागणी केली होती. 15 दिवसांपूर्वी मुख्याधिकारी भालेराव यांनी व्यापाऱ्यांना इमारत खाली करण्याची नोटीस बजावली होती. परंतु कुठल्याही भाडेकरूने गाळे खाली केले नाही. गुरुवारी दुपारी अचानक ही इमारत कोसळली. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
0 Comments