नागरी समस्याबाबत अधिकाऱ्यांची पदाधिकारी व नागरिकांसोबत बैठक
वैजापूर, ता.04 / प्रतिनिधी -
नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून 25 जुन रोजी कार्यभार स्वीकारल्यापासून शहरातील स्वच्छतेसह अन्य सर्व नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित केले असून यावर तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. मात्र, यात नागरिकांचा सक्रिय सहभाग असणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे जेणेकरून शहराची विस्कटलेली घडी पूर्ववत करता येईल असे प्रतिपादन मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी केले. वैजापूर नगर परिषदेच्या फुले आंबेडकर सभागृहात शुक्रवारी ( ता.4 जुलै) आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी काही दिवसांपूर्वीच वैजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारलेले सत्यजीत ताईतवाले यांनीही नागरिकांनी सहकार्य केल्यास प्रशासनाला कुठलीही अप्रिय कारवाई करावी लागणार नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी यांच्या सहभागातून शहर स्वच्छ व सुंदर करू. संपूर्ण जिल्ह्यात क्रमांक एकचे शहर करू अशी अपेक्षा ताईतवाले यांनी व्यक्त केली. या बैठकीत माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशीं यांनीही प्रशासनाला सूचना केल्या.
शहरातील स्वच्छता, नवीन भाजी मंडईतील रस्त्यावरील फळ व भाजी विक्रेते, टिळक रस्त्यावरील वाहतूक, रस्त्यावरील अतिक्रमणे, शहरांत ठिकठिकाणी लावण्यात आलेली पोस्टर्स व बॅनर्स, वाहन पार्किंग, मोकाट जनावरे याबाबत दामोदर पारीक, प्रशांत त्रिभुवन, दशरथ बनकर, सय्यद हिकमत, दिलीपसिंह राजपूत, स्वप्नील जेजुरकर, रियाजउद्दीन शेख आदींनी सूचना मांडल्या. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वसन भागवत बिघोत व सत्यजित ताईतवाले या दोघांनी दिले. शहरात पोस्टर व बॅनर लावण्यासाठी सात जागा निश्चित करण्यात आल्या असून या ठिकाणी पूर्व परवानगीशिवाय कुठलेही पोस्टर लावता येणार नाही. शिवाय खासगी ठिकाणीही पोस्टर लावण्यासाठी परवानागी घ्यावी लागेल असे प्रशासनाने स्पष्ट केले. या बैठकीला शिवसेना (उबाठा) चे शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, दिनेश राजपूत, सलीम वैजापूरी, सावन राजपूत, राजेश गायकवाड, गौरव दोडे, अल्ताफ बाबा यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
0 Comments