वैजापूर, ता.14/ प्रतिनिधी - गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून त्यादृष्टीने निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाने तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डबले यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट आणि गणांची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले होते.त्यानुसार आज सोमवारी (ता.14) जिल्हाधिकारी गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करणार आहेत.
प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात येणार असून 21 जुलैपर्यंत त्यावर हरकती व सूचना सादर करता येणार आहे. त्यानंतर 28 जुलैपर्यंत प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह जिल्हाधिकारी यांच्याकडून विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 11 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येणार आहे.
2011 ची लोकसंख्या गृहीत धरून त्यानुसार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
0 Comments