शिवना टाकळीचे दरवाजे उघडणार - नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कन्नड ता.28 - कन्नड तालुक्यातील कन्नड आणि चिकलठाण या दोन महसुली मंडळात शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला. या पावसाने शिवना आणि गांधारी या नद्यांना मोठा पूर आला असून शिवना टाकळी प्रकल्पात 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पाण्याची आवक अशीच राहिली तर प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होऊन पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहचल्यावर कोणत्याही क्षणी.या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतील अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशफाक शेख यांनी दिली
शिवना आणि गांधारी या दोन्ही नद्यांचे उगमस्थान हे कन्नड व चिकलठाण मंडळात असून शुक्रवारी आणि शनिवारी या मंडळात अतिवृष्टी झाली. रविवारीही जोरदार पाऊस झाल्याने या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत होत्या.त्यामुळे शिवना प्रकल्पात पाण्याची आवक वाढली असून जलसाठा 70 टक्क्यांवर पोहचल्यावर या धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल.अशी माहिती उप अभियंता शेख यांनी दिली.
शिवना टाकळी प्रकल्पाचे हक्काचे पाणी मिळावे - धोंदलगांवसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मागणी
शिवना टाकळी प्रकल्प पूर्ण होऊन तब्बल वीस वर्षे झाली तरी लाभक्षेत्रातील धोंदलगांव व परिसरातील गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकल्पाच्या अपूर्ण चाऱ्याचे काम व अस्तरीकरण करून येणाऱ्या काळात हक्काचे पाणी आम्हाला मिळवून द्यावे अशा आशयाचे निवेदन युवासेनेचे जिल्हाप्रमुख विट्ठल पाटील डमाळे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिले आहे.
युवासेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख विठ्ठल पाटील डमाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. शिवना टाकळी प्रकल्प 2005 ला पूर्ण होऊन तब्बल वीस वर्षे होऊन गेले. प्रकल्पाच्या 55 किलोमीटर लांबीच्या कॅनालसाठी वैजापूर तालुक्यातील धोंदलगांवसह पंचक्रोशीतील उंदीरवाडी, संजरपुरवाडी, राहेगांव, अमानतपुरवाडी, परसोडा, करंजगाव, दहेगाव व राहेगव्हाण या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आली. वीस वर्षे उलटूनही या गावांतील शेतकऱ्यांना अद्याप शिवना टाकळी प्रकल्पाचे पाणी मिळालेले नाही.
मागील महिन्यात तब्बल 42 दिवस या प्रकल्पातून कॅनालला पाणी सुरू होते.130 क्युसेकने हे पाणी सोडण्यात आले होते. कॅनालला सोडलेले पाणी 12 ते 14 दिवसांमध्ये या ठिकाणी पोहोचायला पाहिजे होते. परंतू 42 दिवस कॅनाल चालूनही धोंदलगांव शिवारात पाणी दाखल झाले नाही. कॅनालला सोडण्यात आलेले हे पाणी मुरले कुठे ? असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. असे श्री. डमाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शिवना टाकळी मध्यम प्रकल्प
28/07/2025 सोमवार वेळ-06:00
1) जोत्याची पाणी पातळी =551.80 मी.
2) पूर्ण संचय पाणी पातळी =561.80
3) प्रकल्पीय पूर्ण संचय क्षमता (द.ल.घ.मी) = 39.366
4) प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा
(द.ल.घ.मी) = 36.499
5) आजची पाणी पातळी =560.00 मी.
6) आजची जल क्षमता ( द.ल.घ.मी ) = 26.838
7) आजचा उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी) = 23.921
8) आजची टक्केवारी = 65.63 %
9) सांडवा एकुण विसर्ग = ( निरंक )
10)उजवा कालवा विसर्ग= ( निरंक )
11)डावा कालवा विसर्ग= ( निरंक )
शिवना टाकळी मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग क्रं 1 छत्रपती संभाजी नगर
---------------------------------------------------------------------------
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत 45.99% (19.68 दलघमी) एवढा पाणीसाठा असून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सद्यस्थितीत प्रकल्पात 14014 कुसेक्सनी पाणी आवक होत आहे. सध्या प्रकल्पात येणारी आवक पाहता शिवना टाकळी प्रकल्पाची द्वारे कोणत्याही क्षणी उघडण्यात येतील तरी शिवना नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तटस्नान, वाहने अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवावीत. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
कार्यकारी अभियंता
छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभाग
छत्रपती संभाजीनगर
---------------------------------------------------------------------------
0 Comments