news today, गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती द्या - वैजापूर वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

वैजापूर, ता 30/ प्रतिनिधी -
गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या 17 जुलै 2025 रोजीच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वैजापूर शाखेने केली आहे. 28 जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासनाच्या 9 मार्च 2007 च्या परिपत्रकाचा आधार घेत गायरान जमीन नियमित करून ती धारकांच्या नावे करावी, अशीही मागणी करण्यात आली.

      उपविभागीय अधिकारी डॉ.जऱ्हाड यांना निवेदन देताना 

निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने 17 जुलै रोजी गायरानवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अन्यायकारक आहे. शासनाच्या 9 मार्च 2007 च्या परिपत्रकात 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990 या कालावधीत गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना ती जमीन नियमित करून देण्याचे स्पष्ट आदेश आहेत. तरीही प्रशासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे.
या जमिनींवर अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे काबाडकष्ट करून शेती करत आहेत. ही जमीन काढून घेतल्यास त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे शासनाने त्यांच्या न्यायहक्कांची दखल घ्यावी. गायरान जमीन नियमित करून ती शेती करणाऱ्या धारकांच्या नावे करावी.

प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल. आत्मदहनासारखा टोकाचा मार्गही स्वीकारावा लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष सखाराम शिनगारे, राहुल साळवे, बुद्धभूषण साळवे, भगवान जानराव, निलेश पठारे, अंकुश पठारे, भिमा महाले, अशोक देवकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments