मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा
वैजापूर, ता. 06 / प्रतिनिधी -
वैजापूर पालिकेचे माजी उपाध्यक्ष हाजी अकील सेठ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश निश्चित झाला असून, मंगळवारी (ता.8 जुलै) रोजी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शिक्षक आमदार सतीश चव्हाण यांनी 19 जून रोजी वैजापूरला भेट दिली. त्यावेळी आ.चव्हाण यांनी हाजी अकील सेठ यांच्याहस्ते सत्कार स्विकारला होता. या सत्कार सोहळ्याप्रसंगी आ.सतीश चव्हाण यांनी अकील सेठ यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावर अकील सेठ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे त्यांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर त्यांच्या पक्ष प्रवेशाला मुहूर्त मिळाला असून मंगळवारी (ता.8 जुलै) रोजी दुपारी चार वाजता मुंबई येथे पक्षश्रेष्ठींच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश होणार आहे पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश होणार असल्याने राजकीय वर्तुळात ही महत्वाची घडामोड मानली जात आहे.
हाजी अकील सेठ यांनी वैजापूर नगरपालिकेत विविध पदे भूषविली असून त्यांनी आतापर्यंत काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी या पक्षाच्या माध्यमातून शहरातील राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित आघाडी या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यांना या निवडणुकीत 25 हजार मते मिळाली होती. अकील सेठ यांचे चिरंजीव शेख रियाज हे शिवसेनेचे माजी नगरसेवक असून कृषी उत्पंन बाजार समितीचे संचालक आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
0 Comments