political news, सरकारमघील कलंकित मंत्री व आमदारांना निलंबित करा : शिवसेना ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी

मुंबई, ता.29 - सरकारमधील कलंकित, भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्री आणि आमदारांना बडतर्फ करावे,.सरकार भ्रष्ट आमदार आणि मंत्र्यांना पाठीशी घालत असून राज्यपालांनीच आता कारवाई करावी.अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे केली.



राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे निघाले असून सर्वसामान्यांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भ्रष्टाचारी ,कलंकित व हिंसक आमदार व मंत्र्याना बडतर्फ करून कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्यावेत या मागणीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.


या शिष्टमंडळात शिवसेना पक्षाचे नेते (ठाकरे गट)  अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर,बबनराव थोरात,अशोक धात्रक,  विजय कदम, नितीन नांदगांवकर, आ. अनंत नर, महेश सावंत, मनोज जामसुतकर, आ.मिलिंद नार्वेकर, विठ्ठल गायकवाड, सुषमा अंधारे, उपनेत्या विशाखा राऊत, नितीन देशमुख आदींचा समावेश होता.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,कृषीमंत्री माणिकराव कोकाटे,मंत्री नितेश राणे,गृह राज्यमंत्री योगेश कदम,आमदार संजय गायकवाड,विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनात केली आहे. राज्यपाल न्याय देतील अशी अपेक्षा आहे,मात्र त्यांनी न्याय न दिल्यास आम्ही जनतेच्या दरबारात जाणार ,असे अंबादास दानवे म्हणाले.


 .

Post a Comment

0 Comments