पक्षनिरीक्षकांवर दोन स्वतंत्र आढावा बैठका घेण्याची नामुष्की ; विशाल शेळके यांना तालुकाध्यक्ष करण्याची मागणी
वैजापूर, ता.29/ प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी बेताल वक्तव्ये आणि गैरवर्तन यावरून आधी पक्ष अडचणीत आहे. आता स्थानिक पातळीवरील अंतर्गत राजकारणामुळे अजित पवारांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. वैजापूरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. वैजापूर शहरात आलेल्या पक्ष निरीक्षक संजय जाधव यांना गटबाजीचे दर्शन झाले. गटबाजीमुळे संजय जाधव यांना शहरात दोन स्वतंत्र आढावा बैठका घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.
ठक्कर बाजार येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आणि मुरारी पार्क भागात आयोजित या बैठकींमध्ये पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद उघडपणे मांडले. पक्षातील ही अंतर्गत खदखद पाहून जाधव यांनी खेद व्यक्त केला असून, पक्षाच्या एकजुटीसाठी योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
मुरारी पार्क येथील बैठकीला ज्येष्ठ नेते ॲड. प्रताप निंबाळकर, तालुकाध्यक्ष विजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके, ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर बागुल, विधानसभा अध्यक्ष एल. एम. पवार यांच्यासह गणेश चव्हाण, रमेश चोभे, जगदीश पवार, अशोक देवकर, शिवप्रसाद डमाळे, नितीन तांबे, शुभम वाघ, रमेश शिनगारे, युसूफ शेख यांची उपस्थिती होती. महिला आघाडीच्या संगिता दळे, राणी गायकवाड, कल्पना दळे आणि सविता मोरे यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.
या बैठकीत तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून चर्चा तापली. विद्यमान तालुकाध्यक्ष विजय पवार यांना कायम ठेवण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली, तर दुसऱ्या गटाने डोंगरथडी भागातील तरुण कार्यकर्ता विशाल शेळके यांच्या नावाला पसंती दर्शवली. विशाल शेळके यांना तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्याची एकमुखी मागणी यावेळी झाली. पक्षनिरीक्षक संजय जाधव यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मत ऐकून घेतले आणि या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे एकजुटीवर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दुसरी बैठक ठक्कर बाजार येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली. मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांची जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सबंध जिल्ह्याभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाल्याचे प्रतिपादन वैजापूर तालुका निरीक्षक संजय जाधव यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, आमदार सतीश चव्हाण यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला एक सक्षम व कणखर जिल्हाध्यक्ष लाभला असुन यापुढील काळात त्यांच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले-शिवशाहू-आंबेडकर यांच्या विचार धारेवर चालणारा असुन या पक्षात सर्व समाज घटकाला न्याय देण्याची क्षमता आहे. आगामी काळात तालुक्यासह जिल्हा कार्यकारिणी तयार करत असताना वैजापूर तालुका अग्रस्थानी राहिल याची काळजी निरीक्षक या नात्याने मी घेईल असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.
या बैठकीला ज्येष्ठ नेते हाजी अकिल, युवा नेते पंकज ठोंबरे, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब भोसले, सूरज नाना पवार, जयवंतराव गायकवाड, बाळू शेळके, विनायक गाडे, बाळासाहेब शिंदे, महिला अध्यक्ष हिराताई जाधव, ज्योतीताई कापसे, दिगंबर मोरे, नगरसेवक रियाज शेख, अल्ताफ बाबा, हिकमत काका, ॲड. राफे हसन, सत्यजित सोमवंशी, अशोक म्हस्के, पुंडलिक गायकवाड, आसिफ शेख, एराज शेख, ऋषी वाघ, संदीप मोटे, बाबा त्रिभुवन, गणेश डिके, हरी कदम, गणेश अनर्थे, ऋतुराज सोमवंशी, राहुल कुंदे, गणेश चांगले, ऋषी वर्पे, संकेत चुडीवाल, संकेत मोडके, अमोल तागड, जावेद शेख, अझहर शेख, अल्ताफ शेख, अमृत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वैजापूरमधील या दोन बैठका आणि त्यामधील चर्चा यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी स्पष्टपणे समोर आली आहे. तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून कार्यकर्त्यांमधील मतभेद इतके तीव्र झाले आहेत की, पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षनिरीक्षक संजय जाधव यांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला असला, तरी येणाऱ्या काळात पक्ष नेतृत्वाला हा वाद मिटवण्यासाठी कसोटी लागणार आहे.
0 Comments