गोदावरी नदीला पूर ; गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वैजापूर, (ता. 07/ प्रतिनिधी -
नाशिक जिल्हयात सलग दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असून धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांमधील विसर्गात वाढ करण्यात आली असून गोदावरीला तिसऱ्यांदा पूर आला आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 39 हजार 172 हजार क्युसेस पाणी विसर्ग सुरु असून गोदावरी दुथडी भरुन वाहू लागली असून पूरस्थितीत वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात घोटी व इगतपुरी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पाण्याची चांगली आवक होत असून धरणांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत पाणलोट क्षेत्रात असलेल्या प्रमुख धरणांमध्ये कालपर्यंत 34 हजार 341 द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध होता. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे काल सायंकाळी गंगापूर धरणातून 5 हजार 186 क्युसेस, दारणा धरणातून 9 हजार 932 क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात आला असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 39 हजार 172 क्युसेस पाणी गोदापात्रात सोडण्यात आले आहे. या विसर्गामुळे गोदावरीचे पात्र तुडुंब भरून वाहत असून पूररस्थितीत वाढ होण्याची शक्यता आहे.
0 Comments