मागेल त्याला सौर ऊर्जा योजना अद्याप कागदावरच !
वैजापूर, ता 07 /प्रतिनिधी - '
मागेल त्याला सौर ऊर्जा' ही शासनाची योजना अद्याप कागदावरच असून पैसे भरूनही या योजनेचा लाभ नसल्याची तक्रार वैजापूर तालुक्यातील 20 ते 25 गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाच्या मागेल त्याला सौर ऊर्जा या योजनेअंतर्गत गारज ( तां. वैजापूर) येथील महावितरण कंपनीच्या विद्युत उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या 20 ते 25 गावांमधील असंख्य शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पॅनलसाठी प्रत्येकी 33 हजार रुपये संबंधित कंपनीकडे जमा केले असूनही त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील गारज परिसरातील पोखरी, मनेगांव, साकेगांव, मनूर, भोकरगांव, झोलेगांव, बायगांव, बाभुळगांव, जांबरखेडा, मालेगांव, लाखणी, मांडकी, भायगांव, पाथरी, शिवगांव यासह इतर काही गावांतील अनेक शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा योजनेसाठी प्रत्येकी 33 हजार रुपये भरले असून दहा ते बारा महिने होऊनही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. परिणामी, शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये संबंधित विभागात जमा झाले आहेत. मात्र, कंपनी निवडतांना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0 Comments