Today news, पालकमंत्री शिरसाठ यांचा चहा पिण्याचा मूड ; अन वैजापुरात दहा मिनिटांसाठी वाहतुकीची कोंडी

वैजापूर, ता .22 / प्रतिनिधी -  वेळ साधारणतः दुपारी एक वाजेची..राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचा वाहनांचा ताफा अचानक शहरात दाखल होतो. वाहनातून  सामाजिक न्यायमंत्री शिरसाठ हे चहा पिण्यासाठी हाॅटेलसमोर थांबतात अन् अचानकच नागरिकांची गर्दी होते. 

सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पैशांची बॅग असो की  हाॅटेल प्रकरण असो. यानिमित्ताने ते प्रकाशझोतात आहे. आजही ते शहरात चहा पिण्यासाठी आले अन् वाहतुकीची कोंडी करून गेले. त्याचे झाले असे की, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा ताफा नाशिकच्या दिशेने वैजापूर शहरात दाखल झाला अन् शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अचानक थांबला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. वाहनातून संजय शिरसाठ उतरले अन् ते त्यांनी चहा पिण्यासाठी एका हाॅटेलचा 'सहारा' घेतला. ताफ्यातील वाहने वैजापूर -गंगापूर राज्य महामार्गावरच उभी असल्याने वाहतुकीची थोडी कोंडी झाली. 

विशेष म्हणजे याच धामधुमीत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचेही वाहन अडकले. परंतु ते वाहन कसरत करून गुमान पुढे गेले. मंत्र्यांचा ताफा म्हटल्यावर तिथे कुणाची काय बिशाद आहे की, वाहनं बाजूला घ्यायला सांगायची. एरवी सामान्य वाहनचालकांना रस्त्यावर वाहने लावणाऱ्यांना दंड ठोकून मोकळे होणारे आरटीओचे वाहन मात्र गुमान मान खाली घालून गेले. शिरसाटांनी चहा घेतला अन् नंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. परंतु साधारणतः सात-आठ मिनिटे वाहतुकीची कोंडी करून गेले.

Post a Comment

0 Comments