vaijapur news, महाशिवरात्रीला बेल पानाला केवळ स्पर्श केला तरी श्री शंकर स्मरणाचे पुण्य - प. पूज्य पंडित प्रदीप मिश्रा

सहावे पुष्प महाशिवरात्रीचे ; महाराजांनी सांगितले बेलपानाचे महत्व 

वैजापूर, ता. 2/ प्रतिनिधी -
वैजापूरात मागील पाच दिवसांपासून श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे सुरु असलेल्या बेलपत्र श्री शिव महापुराण कथेचे सहावे पुष्प गुंफतांना कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी मंगळवारी महाशिवरात्रीची कथा सांगत जमलेल्या लाखो भाविकांना मंत्रमुग्ध केले. या कथेतून त्यांनी पुन्हा एकदा श्री. शंकर अर्थात महादेवाला अतिशय प्रिय असलेल्या बेल पानाचे महत्व विषद केले. महाशिवरात्रीला बेलपानाला केवळ स्पर्श केल्यानेही श्री शंकर स्मरणाचे पुण्य लाभते असे महाराजांनी सांगितले. कथा श्रवण करण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक शिव कल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुली या ठिकाणी जमा झाले होते. 
उद्योजक जीवनलाल संचेती, विशाल संचेती व बाळासाहेब संचेती यांनी शिव कथा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याबद्दल प्रदीप मिश्रा यांनी कथे दरम्यान त्यांचा विशेष नामोल्लेख केला.

यावेळी महाराजांनी शिवमहापुराण कथेतील अनेक प्रसंग आपल्या अमृतवाणीतून सांगितले. श्री शंकराविषयी श्रद्धा भाव, विश्वास, मेहनत करण्याची तयारी हे गुण आत्मसात केल्याशिवाय फळ मिळू शकत नाही. लोक कलियुगाला वाईट म्हणतात. पण शिवमहापुराण कलियुगाला वाईट अजिबात म्हणत नाही. निंदा करणारे लोक अगदी सतयुग, त्रेतायुग व द्वापार युगातही होते. त्रेतायुगात माता सीतेलाही अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. द्वापार युगात भगवान कृष्णालाही माखन चोर म्हंटले जात होते. सतयुगातही असे लोक असल्याचा दाखला महाराजांनी दिला. मात्र अशा नींदेला न घाबरता सत्कर्म करीत रहा असे महाराज म्हणाले.
बुधवारी (2 जुलै) शेवटच्या दिवशी कथेच्या वेळात बदल करण्यात आला होता. कथाकार प्रदीप मिश्रा हे सकाळी आठ ते अकरा या वेळेत कथा सांगणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले. माजी नगराध्यक्ष साबेर खान, डॉक्टर राजीव डोंगरे, साहेबराव औताडे आदींनी महाराजांचे शाल व पुष्पहार अर्पण करून पूजन केले.

Post a Comment

0 Comments