वैजापूर, ता .3/ प्रतिनिधी -
वैजापूर शहरात मागील सात दिवसांपासून लाखो भाविकांच्या साक्षीने शिव कल्पवृक्ष नगरी (लाडगाव रोड चौफुली) येथे श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे सुरु असलेल्या बेलपत्र श्री शिव महापुराण कथेची सांगता अतिशय उत्साही वातावरणात व भक्तीभावाने करण्यात आली. शिव तत्व हे समस्त मानवी जीवाच्या कल्याणासाठी असून करुणानिधी भोलेश्वर शंकर वैजापूरकरांची झोळी आनंदाने भरून दे, त्यांचे दुःख दूर कर व त्यांच्या जीवनात भक्तीचा मळा फुलू दे अशी प्रार्थना भगवान शंकराकडे करत कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी बुधवारी (ता.03) .श्री शिव महापुराण कथेला विराम दिला. यावेळी जमलेल्या लाखो भाविकांनी उभे राहून हर हर महादेवचा जयजयकार करत श्री शंकराची आळवणी केली.
शिव महापुराण कथेचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी आठ ते अकरा या वेळेत लाखो भाविकांनी कथा ऐकण्यासाठी तीनही मंडपात तसेच मंडपाच्या बाहेरही गर्दी केली होती. मिळेल त्या ठिकाणी बसून भाविकांनी महाराजांच्या अमृतवाणीतून कथा श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी महाराजांनी महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्लिंगे, अष्टविनायक या तीर्थक्षेत्रांचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्रात जणू भगवान शंकराचे नातेवाईकच राहतात याप्रमाणे ज्योतिलिंगाच्या रूपाने इथे भगवान शंकराचे वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यायचे असेल तर कुणीही अदबीने यावे असे महाराज गंमतीने म्हणाले. त्यांनी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचाही उल्लेख कथेदरम्यान केला. राजे शिवाजी यांचे मावळेही मोहिमेच्या वेळी ' हर हर महादेव' असा जयघोष करत असल्याचे महाराज म्हणाले. वैजापूर येथील आयोजक जीवनलाल संचेती, बाळासाहेब संचेती व विशाल संचेती यांच्या कुशल नियोजन व भाविकांनी दिलेली मोलाची साथ यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे महाराजांनी सांगितले. माजी मंत्री डॉक्टर भागवत कऱ्हाड यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर बाळासाहेब संचेती यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेल्या सर्वांचे आभार मानले. त्यानंतर बाळासाहेब संचेती यांच्या निवासस्थानापासून पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांना निरोप देण्यात आला.
0 Comments