--------------------------
महालगांव ता. 22 - 'आम्ही पोलीस आहोत' अशी बतावणी करून दुचाकीस्वार भामट्यांनी वृध्द महिलेचे 4 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना महालगांव ता.वैजापूर येथे गुरुवारी (ता.2) दुपारी घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगुर (ता.वैजापूर) येथील
तारा प्रल्हाद चव्हाण (वय 69) या आपल्या पतीसह मोटारसायकलने छञपती संभाजीनगरला जात असताना महालगांव येथील पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांना थांबविले व आम्ही पोलीस आहोत, पुढे गंगापूरला दंगल सुरू आहे तुम्ही तुमचे सोने बॅगमध्ये व्यवस्थित ठेवा असे सांगितले. पोलीस म्हणून आलेल्या या दोन्ही व्यक्तीवर विश्वास ठेवून तारा चव्हाण यांनी अंगावरील चार तोळ्याचे गंठण, एक तोळ्याचे मंगळसूत्र व एक तोळ्याची आंगठी असे चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढले. मोटारसायकलवर आलेल्या त्या दोघांपैकी एकाने ते दागिने स्वतःकडे घेतले व कागदाच्या पुडीत दागिने ठेवल्याचा बनाव करून हातचालाखीने त्या पुडीत खडे टाकून ती पुडी तारा चव्हाण यांच्या बॅगेत ठेवून तेथून पोबारा केला. काही वेळानंतर तारा चव्हाण यांनी पुडी तपासली असता त्यांना धक्काच बसला. दागिन्याऐवजी पुडीत दगडाचे खडे त्यांना दिसले आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी तारा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरगांव पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक माने हे अधिक तपास करीत आहेत.
0 Comments