प्रभाकर जाधव
-------------------------
गारज ता. 22 - गारजसह परिसरामध्ये रानडुकराने शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकामध्ये सर्रास हैदोस घालून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी लावल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.  
गारज, मनुर, भोकरगाव, बायगांव, जांबरखेडा, झोलेगाव, बाभुळगांव, शिवगांव , पोखरी, पाथरी, लाखणी, मांडकी, भायगाव गंगा, उंदरवाडी, सोनवाडी, राजुरा, राहेगाव, बाभुळखेडा, खिर्डी, मालेगाव , साळेगाव, सासेगाव, साकेगाव, मनेगाव, वाघला, भटाणा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी, मका, आणि भुईमूग, डांगर हे नगदी समजले जाणारे पीक घेतले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा खर्च झाला आहे त्यातच एक ते दीड महिना या परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र मागील आठवड्यामध्ये जेमतेम पाऊस पडल्याने पीक परिस्थिती सुधारली असून पिके जोमात आहे. त्यातच आता या भागामध्ये रानडुकराने या पिकांवर ताव मारून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू केल्याने शेतकरी पार मेटाकोटीला आला असून दुहेरी संकटात सापडला आहे तेव्हा तात्काळ या भागामध्ये वन विभागाने लक्ष घालून रान डुकराचा बंदोबस्त करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे
 
0 Comments