crime news, मुंबईकडे जाणारा 63 लाख रुपये किंमतीचा गुटखा पकडला ; वैजापूर पोलिसांची कारवाई

वैजापूर, ता .20 / प्रतिनिधी - राज्य सरकारने प्रतिबंधीत केलेला गुटखा अमरावतीहून - मुंबईकडे वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला पोलिसांनी बुधवारी (20) सकाळी वैजापूर - कोपरगांव रस्त्यावर पकडले. टेम्पोत असलेला 63 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून, टेम्पो चालक श्रीमन छोटेलाल प्रसाद (गोंड) रा.बालिया, उत्तरप्रदेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, गंगापूरकडून - वैजापूरमार्गे - कोपरगावकडे आयशरने (क्रमांक एम.एच. 04 एल.ई. 3959)  महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा भरून अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकाने वैजापूर ते कोपरगाव जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या कादरी मोटर गॅरेज समोर माहितीतील आयशर वाहन अडविले. पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपनीचा 63 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सुमारे 63 लाख रुपये किंमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला ब्लेंडेड बाजीराव पान मसाला, मस्तानी 216 सुगंधित तंबाखू साठा व 20 लाख रुपये किंमतीचे वाहन असा 83 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

पोलीस अधिक्षक डॉ विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधिक्षक अन्नपूर्णासिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाडळे, पोलीस उपनिरीक्षक आर आर.जाधव, हवालदार अमोल राजळे, योगेश झाल्टे, कुलदीप नरवडे, प्रशांत गिते, अजित नाचन, सचिन रत्नपारखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments