छत्रपती संभाजीनगर, दि.21 (जिमाका) - गणेश उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन पोलीस प्रशासन व गणेश मंडळ, नागरिकांत संपर्क, संयम आणि समन्वयाने उत्साहात गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश उत्सावाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते. बैठकीत आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सार्वजनिक सुरक्षेची काळजी, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच विसर्जनासाठी करण्यात आलेल्या विशेष नियोजनाबाबत संबंधित विभागांना सूचना जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी दिल्या.
गणेश मूर्तींच्या आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून पुरेशा संख्येने बंदोबस्त ठेवण्यात यावा. विसर्जन मिरवणूकी वेळी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक नियमन करण्याचे विसर्जनासाठी नद्या, तलाव तसेच कृत्रिम तलावांवर पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच उत्सावाचा काळात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार याची विशेष काळजी घेण्यात यावी. स्वच्छता मोहिम राबवून पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करावी. पर्यावरणपूरक मूर्ती व नैसर्गिक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. आरोग्य विभागाने आपत्कालीन वैद्यकीय सुविधा व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. उत्सवाचा काळात जिल्ह्यातील संपूर्ण सार्वजनिक गणेश मंडळाची संपर्क यादी अद्यावत करुन पोलीस प्रशासनाने मंडळाच्या संपर्कात राहावे तसेच अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून विशेष तपासणी मोहिम राबविण्यात यावी, यात मिठाई, मोदक, नैवद्य, भेसळयुक्त पदार्थ तसेच दुकानावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी श्री.स्वामी यांनी दिले.
0 Comments