नाशिक ता.21 - नाशिक जिल्हयातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे या भागातील दारणा, गंगापूर, मुकणेसह विविध धरणात पाण्याची आवक वाढली असून धरणांतील पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दारणा, गंगापूरसह विविध धरणांतून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. बुधवारी (ता.20) रात्री नऊ वाजता नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 31 हजार 283 क्युसेकने गोदावरीत पाणी विसर्ग सुरू होता. मोठ्याप्रमाणात पाणी विसर्ग सुरू असल्याने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्हयातील घाटमाथ्यावरील इगतपुरी, घोटी, भावली परिसरात मंगळवारी व बुधवारी मुसळधार पाऊस झाल्याने दारणा, गंगापूर, मुकणे, भाम, भावली तसेच गंगापूर समूहातील गंगापूर, कश्यपी, गौतमी या धरणात नवीन पाण्याची आवक वाढल्याने गोदावरीत पाणी विसर्ग करण्यात येत आहे. दारणातून मंगळवारी सकाळी 400 क्युसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळी जोरदार पाऊस होऊन पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढविण्यात येऊन 22 हजार 530 क्युसेक करण्यात आला. भाम व भावली ही दोन्ही धरणं तुडूंब भरली असून गंगापूर धरणात 92.47 टक्के पाणीसाठा आहे. भावलीतून 2324 क्युसेक तर भाम धरणातून 6029 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू असून या धरणातून 6340 क्युसेक, कश्यपी धरणातून 3888 क्युसेक, गौतमीतून 3450 कयुसेकने विसर्ग सुरू आहे.
दारणा,गंगापूर समुहाबरोबरच मुकणे धरणातून 1655 क्युसेक, वालदेवीतून 814 क्युसेक, आळंदीतून 687 क्युसेक, कडवातून 1598 क्युसेक तर पालखेड धरणातून 772 क्युसेकने गोदावरीत विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात हे पाणी येत असून बंधाऱ्यातून गोदावरीत पाणी सोडण्यात येत आहे. गोदावरी नदीपात्रात मोठ्याप्रमाणांत विसर्ग सुरु असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0 Comments