वैजापूर - गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर जलद कालव्याला 403 क्युसेकने पाणी विसर्ग
नाशिक, ता. 08 - गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने नाशिक जिल्हयातील विविध धरणांतून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याद्वारे गोदापात्रात सोडण्यात येणारे पाणी गुरुवारपासून (ता.07) बंद करण्यात आले आहे. मात्र, या बंधाऱ्यातून गोदावरीचे दोन्ही कालवे तसेच वैजापूर - गंगापूर भागात जाणारा जलद कालवा सुरू आहे. पाण्याची आवक वाढली तर गोदावरीत पुन्हा विसर्ग होऊ शकतो.
पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक मंदावली आहे. दारणा, गंगापूर व इतर धरणांतून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात येणारे पाणी कमी झाल्याने गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून बंधाऱ्यातून गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. एक जूनपासून आतापर्यंत गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 42 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, गोदावरीच्या उजव्या कालव्याला 300 क्युसेक, डाव्या कालव्याला 150 क्यूसेक तर नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यातून वैजापूर - गंगापूर तालुक्यासाठी 403 क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे.
दारणा धरणातून 550 क्युसेक, वालदेवीतून 107 क्युसेक, आळंदीतून 37 कयुसेस, भावलीतून 73 क्यूसेक, भाम मधून 374 क्यूसेक, वाघाड मधून 380 क्युसेक तर तिसगांव मधून 47 कयुसेक पाणी विसर्ग सध्या सुरू आहे. नाशिक जिल्हयातील धरणांमध्ये 89.60 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी तो 75 .44 टक्के इतका होता. या वर्षी पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांची स्थिती चांगली आहे.
नाशिक जिल्हयातील विविध धरणातील पाणीसाठा -
नाशिक जिल्हयातील विविध धरणांमध्ये गुरुवार (ता.07) सकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असलेला पाणीसाठा असा - दारणा -85.51 टक्के, मुकणे - 95.30 टक्के, वाकी - 87 टक्के, भाम -100 टक्के, भावली - 100 टक्के, वालदेवी - 100 टक्के, गंगापूर - 82.34 टक्के, कश्यपी - 100 टक्के, गौतमी गोदावरी - 98.93 टक्के, कडवा - 89.63 टक्के, आळंदी - 100 टक्के, भोजापूर - 88.37 टक्के, पालखेड - 69.53 टक्के व करंजवन 84.33 टक्के पाणीसाठा आहे.
0 Comments